या आहेत जगातील काही बहुमूल्य वस्तू

antique
या जगामध्ये हिरे-माणिके, सोने चांदी अशा वस्तू बहुमूल्य आहेत हे जरी खरे असले, तरी या जगामध्ये काही अशा वस्तूही उपलब्ध आहेत, ज्या दिसायला अगदी सर्वसामान्य असल्या तरी बहुमूल्य आहेत. ‘क्रेम द ला मेअर’ नामक अँटी एजिंग क्रीम हे जगातील सर्वात किंमती प्रसाधनांच्या पैकी एक असून, या क्रीमच्या एका ग्रामकरिता ग्राहकांना ३.७५ डॉलर्स, म्हणजे तब्बल अडीचशे रुपये मोजावे लागतात. चेहऱ्यावरून वाढत्या वयाच्या खुणा लपविणारे हे क्रीम दुर्मिळ नैसर्गिक औषधींचा वापर करून बनविण्यात आले आहे. यामध्ये समुद्री वनस्पती, समुद्री वनस्पतींपासून तयार केलेली तेले, लिंबाचा अर्क इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ‘कॅव्हीयार’ म्हणजे माश्यांची कच्ची अंडी हा पाश्चात्य देशांमध्ये अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पण अतिशय महाग पदार्थ आहे. त्यातून ‘इराणियन बेलूगा कॅव्हीयार’ हा जगातील सर्वात महाग कॅव्हीयार असून, प्रती ग्राम कॅव्हीयार साठी तब्बल पाच डॉलर्स मोजावे लागतात.
antique1
‘तोआक’ चॉकोलेट हे जगातील सर्वात महागड्या चॉकोलेट्स पैकी असून, तोआक चॉकोलेटच्या एका ग्रामसाठी तब्बल चौदा डॉलर्स मोजावे लागतात. ७७% शुद्धतेच्या, खास एक्वाडोरमधून आणविलेल्या कोकोच्या बियांचा वापर करून हे चॉकोलेट तयार केले जाते. त्यामुळे पन्नास ग्राम वजन असलेल्या एका तोआक चॉकोलेट बारची किंमत साधारण सातशे डॉलर्सच्या घरात असते. निकेल आणि तांबे या दोन धातूंचे ‘बाय प्रोडक्ट’ असलेला इरीडीयम हा धातू अतिशय मौल्यवान असून, याची किंमत सोन्याहूनही अधिक आहे. अजिबात गंज न लागू शकणारा हा धातू शुभ्र चंदेरी रंगाचा दिसतो. या धातूच्या एका ग्रामसाठी ५३ डॉलर्स इतकी किंमत आहे.
antique2
‘दा होंग पाओ’ नामक चहा जगातील सर्वात महाग चहांपैकी एक असून, या चहाच्या एका ग्रामसाठी चौदाशे डॉलर्सची किंमत मोजावी लागते. या चहाच्या आणखी काही उपप्रजाती असून, त्या आणखी महाग आहेत. २००२ साली या चहाच्या दुर्मिळ प्रजातीच्या केवळ वीस ग्राम साठी एका ग्राहकाला २८,००० डॉलर्स मोजावे लागले होते. तसेच ताफाईट नामक रत्ने हिऱ्याच्या पेक्षाही दुर्मिळ असून, या रत्नाची किंमत एका कॅरटमागे अडीच हजार डॉलर्सहूनही अधिक आहे. ताफाईट प्रमाणेच बेन्टोनाईट हे रत्न कॅलिफोर्नियातील सॅन बेनितो प्रांतामध्ये सापडत असून या रत्नाची प्रती कॅरट किंमत वीस हजार डॉलर्सहूनही अधिक आहे.

Leave a Comment