१६४१ साली बुडालेल्या जहाजाचा सापडला नांगर, जहाजावर बहुमूल्य खजिना असण्याचा कयास

anchor
इंग्लंडमध्ये कॉर्नवॉल येथे मासेमारीसाठी गेलेल्या काही कोळ्यांच्या जाळ्यामध्ये अचानक अतिशय अवजड वस्तू अडकली असल्याची जाणीव त्यांना झाली. जाळी पाण्याच्या बाहेर ओढून काढल्यानंतर एका जहाजाचा नांगर जाळ्याबरोबर बाहेर आला. या नांगराचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यानंतर हा नांगर सतराव्या शतकामध्ये जलसमाधी मिळालेल्या ‘एल डोराडो ऑफ द सीज्’ या जहाजाचा असल्याचे कोळ्यांच्या लक्षात आले, आणि जर हा नांगर त्याच जहाजाचा असला, तर ते जहाजही जवळपास कुठे तरी सापडण्याची शक्यता लक्षात घेऊन कोळ्यांनी ताबडतोब सरकारी अधिकाऱ्यांना याची सूचना दिल्याने आता हे जहाज किंवा त्याचे अवशेष मिळविण्यासाठी शोधकार्य सुरु केले जात आहे.
anchor1
१६४१ साली हे जहाज मेक्सिकोहून ब्रिटनकडे परतत असताना अचानक झालेल्या वादळामुळे या जहाजाला जलसमाधी मिळाली. हे जहाज मालवाहू जहाज असून, ज्या वेळी हे बुडाले त्यावेळी त्यावर १००,००० पाउंड्स वजनाचे सोने आणि चारशे चांदीच्या विटा असल्याचे म्हटले जात असल्यामुळे हे जहाज सापडले, तर पर्यायाने यावरील खजिन्याचे काय झाले याचाही शोध लागेल असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.
anchor2
ज्या ठिकाणी जहाजाचा नांगर सापडला त्याच परिसरामध्ये जहाजाचे अवशेषही कदाचित सापडतील अशी आशा शोधकर्त्यांना आहे. तसेच या जहाजाचे अवशेष किंवा या जहाजावर असलेल्या तथाकथित खजिन्यापैकी काही जर शोधकर्त्यांच्या हाती लागले, तर सापडलेले धन सरकारी तिजोरीमध्ये जमा करावे लागणार आहे. कायद्यानुसार ब्रिटीश सरकाराधीन असलेल्या सागरी हद्दीमध्ये जर हा खजिना सापडला, तर याची सर्वप्रथम सूचना सरकारी अधिकाऱ्यांना द्यावी लागत असली, तरी शोधकर्त्यांना या खजिन्यापैकी काही भाग स्वतःकडे ठेवण्याची परवानगी देण्याची खास तरतूदही या कायद्यामध्ये केलेली आहे. सध्या तरी या जहाजाचे अवशेष शोधून काढण्याची कामगिरी शोधकर्त्यांच्या पुढे असून यासाठी अद्ययावत यंत्रसामग्री आणि कुशल पाणबुड्यांची आवश्यकता आहे.

Leave a Comment