इथियोपियन एअरलाईन्सच्या अपघातातून याचे योगायोगानेच वाचले प्राण

crash
इथियोपिया मधील आदिस अबाबा येथून केन्या देशातील नैरोबीकडे निघालेले इथियोपियन एअरलाईन्सचे विमान दहा मार्च रोजी दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातामध्ये विमानात असलेले सर्व १४९ यात्रेकरु आणि आठ जणांचा केबिन क्र्यू असे सर्व मृत्युमुखी पडले. मात्र एका ग्रीक नागरिकाचे नशीब बलवत्तर, म्हणून अगदी योगायोगानेच का होईना, पण या प्रसंगातून तो बचाविला. ‘दैव तारी त्याला कोण मारी’ याचे जिवंत उदाहरण या मनुष्याचा रूपात सर्वांनाच पहावयास मिळाले.
crash1
झाले असे, की अँटोनिस माव्रोपौलोस याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या तर्फे आयोजित केल्या गेलेल्या एका महत्वाच्या कार्यक्रमासाठी नैरोबी येथे जायचे होते. इथियोपियन एअरलाईन्सच्या ET-302 या नैरोबीला जाणाऱ्या विमानाचे तिकीटही त्याने बुक केले होते. मात्र विमानतळावर पोहोचण्यासाठी त्याला काही मिनिटांचा विलंब झाला. अँटोनिस घाईगडबडीत विमानाच्या बोर्डिंग गेटपर्यंत पोहोचला खरा, पण तोवर विमानाचे बोर्डिंग बंद करून विमान रनवेच्या दिशेने निघाले होते. त्यामुळे अर्थातच एअरलाईन्स कर्मचाऱ्यांनी त्याला विमान निघून गेल्याचे सांगितले.
crash2
फ्लाईट चुकल्याने हवालदिल झालेल्या अँटोनिसला एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी नैरोबीला जाणाऱ्या पुढल्या विमानाचे तिकीट दिलेही, पण ज्या कार्यक्रमासाठी नैरोबीला पोहोचणे आवश्यक होते, तिथे वेळेवर पोहोचणे शक्य होणार नसल्याने अँटोनिस मात्र चांगलाच नाराज झाला होता. काही वेळाने अँटोनिसला विमानतळावरील पोलीस कक्षामध्ये पाचारण करण्यात आले. नक्की काय घडले आहे याची काहीच कल्पना नसलेल्या अँटोनिसची ओळखपत्रे आणि आधीच्या विमामानाची तिकिटे पोलिसांनी त्याच्याकडे मागितली, व विमान बोर्ड का केले नाही याच्या कारणाची विचारपूस केली, तेव्हा अँटोनिस अधिकच बुचकळ्यात पडला. अखेरीस त्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याला खरा प्रकार सांगितला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ET 302 हे विमान ‘बोर्ड’ न केलेला अँटोनिस हा एकमेव यात्रेकरू असल्याचे सांगून विमान बोर्ड न केलेला यात्रेकरूची ओळख पटविण्यासाठी म्हणून अँटोनिसला ओळखीचे दाखले मागितले गेले असल्याचे पोलिसांनी त्याला सांगितले. त्याचबरोबर अँटोनिस ज्या विमानाने प्रवास करणार होता ते विमान दुर्घटनाग्रस्त झाले असून, सर्व यात्रेकरूंचा मृत्यू झाला असल्याचेही अँटोनिसला सांगण्यात आले. घडला प्रकार समजल्यानंतर अँटोनिसला मोठा धक्का बसला. ज्या विमानाला अपघात होऊन १४९ यात्रेकरू मृत्युमुखी पडले, त्याच विमानाचे आपण एकशे पन्नासावे यात्रेकरू असणार होतो या विचारानेच तो अस्वस्थ झाला. ही सर्व घटना अँटोनिसने सोशल मिडियावर शेअर केली आहे.
crash3
नैरोबीकडे निघालेले ET-302 हे इथियोपियन एअरलाईन्सचे विमान आदिस अबाबाहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच दुर्घटनाग्रस्त झाले. या विमानाने अनेक देशांचे नागरिक प्रवास करीत असून, संयुक्त राष्ट्रसंघाचे अनेक कायकर्तेही या विमानामध्ये होते.

Leave a Comment