मोबाईल डेटाचा बकासूर – भारत

internet
साधारण दीड वर्षांपूर्वीची एक बातमी आठवते का? भारतीय लोकांनी व्हाटसअपवरून पाठविलेल्या फुलांच्या संदेशांमुळे इंटरनेटवर ताण येत आहे, असे गुगलने जाहीर केले होते. त्यावेळी या गोष्टीची खूप चर्चा झाली होती.

फुले आणि पानांसोबत देव-देवतांच्या छायाचित्रांनी भरलेले हे संदेश म्हणजे स्मार्टफोन असलेल्या प्रत्येक भारतीय व्यक्तीचा जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. प्रत्येक दिवशी आपल्या व्हाटसअपवर अशा गुड मॉर्निंगचा मारा होतो. मात्र याच शुभेच्छा संदेशांसाठी गेल्या पाच वर्षांत गुगलवर फुलांच्या छायाचित्रांचा शोध घेण्याचे प्रमाण 10 पट वाढले आहे. त्यामुळेच इंटरनेटवर ताण आल्याचा दावा गुगलने केला होता.

व्हाटसअपचे भारतात त्यावेळी सुमारे 20 कोटी सक्रिय वापरकर्ते होते. आज तर त्या संख्येत आणखीच वाढ झाली आहे. त्यामुळेच भारत ही व्हाटसअपची मोठी बाजारपेठ असल्याचे मानले जाते. भारतात गुगलवर घेण्यात येणाऱ्या छायाचित्रांमध्ये या शुभेच्छा संदेशांचे प्रमाण मोठे असते, असे सिलिकॉन व्हॅलीतील संशोधकांचे म्हणणे आहे. एकट्या 2018 च्या नववर्षदिनी भारतात सुमारे 2 कोटी शुभेच्छा संदेश पाठविण्यात आले होते आणि हा एक विक्रम होता. वेस्टर्न डिजिटल या डाटा स्टोरेज कंपनीने केलेल्या संशोधनानुसार, दररोज भारतातील प्रत्येक तीनमधील एका फोनची मेमरी भरून जाते तर अमेरिकेत हेच प्रमाण 10 पैकी एक स्मार्टफोन असे आहे. अखेर या त्रासातून मुक्त होण्यासाठी गुगलने डिसेंबर महिन्यात ही छायाचित्रे काढून टाकण्यासाठी एक स्वतंत्र अॅप काढले होते.

भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांची जागतिक पातळीवर दखल घेण्याची ही पहिलीच वेळ होती. भारतीय बाजारपेठेच्या आकाराचे महत्त्व जाणवण्याची सुद्धा ही पहिलीच वेळ. मोबाईल डेटाची भारताची भयानक भूक दाखवून देण्यासाठी ती पुरेशी होती. ही भूक वाढतच जात असून ती जणू कधीही संपणार नाही, अशी लक्षणे दिसत आहेत. अर्थात एवढ्या मोठ्या आकाराच्या या देशात आणि प्रचंड मोठी शिक्षित लोकसंख्या असलेल्या या देशात मोबाइल डेटाची मागणी नेहमीच वाढती राहणार, हे स्वाभाविकच आहे. एक प्रकारे भारत हा मोबाईल डेटाचा बकासूर बनला आहे.

भारतीय लोकांनी वापरलेल्या डाटामध्ये 2017 ते 2022 पर्यंत तब्बल 72 टक्क्यांनी वाढ होईल. स्मार्टफोनच्या प्रसारामुळे इंटरनेटबद्दलची जागरुकता आणि भूक अशी वाढली आहे, की 2017 मध्ये 30.2 टक्के असलेला इंटरनेटच्या वापराचा दर येत्या तीन वर्षांत 56.7 पर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. भारतात 2018 मध्ये 48 कोटी 30 लाख इंटरनेट वापरकर्ते होते. हा आकडा 2023 मध्ये 66 कोटी 64 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अॅसोचेम-प्राईस व्हाटर कूपर या संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

यापूर्वी अन्य संस्था-कंपन्यांनी केलेल्या पाहणीतही असेच निष्कर्ष काढण्यात आले होते. जगभरात सर्वाधिक डेटा वापरणाऱ्या देशांमध्ये भारताचे स्थान अव्वल आहे. मोबाईल डेटाच्या वापराच्या बाबतीत आपण अमेरिका आणि चीनलाही मागे टाकले आहे, असे गेल्या वर्षीच्या शेवटी ओमिदयार नेटवर्कने जारी केलेल्या अहवालात म्हटले होते.

भारतीय वापरकर्ते दर महिन्याला १50 कोटी जीबी मोबाईल डेटा वापरतात. गंमत म्हणजे, अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये दर महिन्याला वापरल्या जाणाऱ्या मोबाईल डेटाची बेरीज केली तरी भारतातील मोबाईल डेटाचा वापर जास्त भरतो. भारतातील इंटरनेट वापरकर्ते आपला सरासरी 70 टक्के वेळ व्हॉट्सअॅप, फेसबुक, संगीत आणि मनोरंजनाच्या अॅप्सवर घालवतात, असा दावाही कंपनीने केला होता.

स्मार्टफोनमुळे इंटरनेटच्या वापरात स्वाभाविकच प्रचंड वाढ झाली आहे. स्मार्टफोनची संख्या 2017 मध्ये 46 कोटी 80 लाख होती आणि 2022 पर्यंत ती 85 कोटी 90 लाखांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. भारतातील इंटरनेटच्या पूर्ण क्षमतेचा वापर झालेला नसतानाही आजच जगभरात भारत ही दुसरी सर्वात मोठी ऑनलाईन बाजारपेठ आहे.

भारतीय लोक स्मार्टफोनचा वापर कशा-कशासाठी नाही करत? बातम्या आणि समालोचनासोबतच राजकारण, चित्रपट, खेळांपासून ते स्टॉक मार्केट्स, आर्थिक माहिती आणि अन्य अनेक गोष्टी अशा विविध क्षेत्रांमध्ये भारतीय लोकांना रस असल्याचे त्यांच्या इंटरनेटच्या वापरातून कळते.
त्यातही ग्रामीण भागातील इंटरनेट वापरकर्त्यांची वाढती संख्या ही आणखी एक मनोरंजक बाब आहे. शहरी भारताने इंटरनेटचा स्वीकार अत्यंत झपाट्याने केला. त्याची एक स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. मात्र ग्रामीण भागही आता यात कमी नाही. भारतातील ग्रामीण भागात देशाची 65 ते 70 टक्के लोकसंख्या राहते. त्यामुळे या बाजारपेठेकडे दुर्लक्ष करणे कोणालाही परवडण्यासारखे नाही.

एवढे सगळे असले तरी मात्र कनेक्टिव्हिटी आणि सातत्य याबाबतीत मात्र पिछाडीवर आहे. ही एक मोठी समस्या आहे आणि तिचे निराकरण करणे आवश्यक आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. देशात सध्या सुमारे 55,617 गावांमध्ये मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही. ईशान्य भारतासारख्या दुर्गम भागांमध्ये आजही दूरसंचार सेवेच्या समस्या आहेत. त्यामुळे किमान इंटरनेटच्या वापरात तरी विषमता निर्माण होऊ नये, एवढीच अपेक्षा!

Leave a Comment