बॉक्सिंगच्या इतिहासातील ही सर्वाधिक कालावधीची मॅच

boxing
६ एप्रिल १८९३ साली न्यू ऑर्लीयन्स, लुइजियाना येथील ऑलिम्पिक क्लब मध्ये अँडी बोवेन आणि जॅक बर्क यांच्यामधील मुष्टीयुद्धाचा सामना हा बॉक्सिंगच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक वेळ सुरु असलेला सामना म्हणून ओळखला जातो. तब्बल सात तास एकोणीस मिनिटे सुरु राहिलेला हा सामना सहा एप्रिलच्या रात्री नऊ वाजता सुरु होऊन सात तारखेच्या पहाटेपर्यंत सुरु राहिला. या सात तासांच्या सामन्यामध्ये एकूण ११० राऊंड्स खेळले गेले. हा सामना जिंकणाऱ्या विजेत्याला ‘लाईटवेट चँपियन ऑफ द साऊथ’ हा खिताब आणि अडीच हजार डॉलर्सचे रोख बक्षीस मिळणार होते. सामन्याच्या सुरुवातीला बर्कचे पारडे जड असून, तोच या सामन्याचा विजेता ठरेल असे वाटत होते, मात्र बोवेनने त्याला कडी टक्कर दिल्याने हा सामना अटीतटीचा ठरला.

बोवेनने बर्कला पंचविसाव्या राउंडमध्ये चीत केले खरे, पण रेफ्रीचे ‘काऊंट आउट’चे आकडे मोजून होईस्तोवर राउंड संपल्याची घंटा वाजली होती. जसजशी ही लढत पुढे सरकू लागली, दोन्ही खेळाडू अधिकाधिक जखमी होऊ लागले. बर्कच्या दोन्ही हातांना भरपूर मार लागला, आणि त्यानंतर दोन्ही खेळाडू इतके थकून गेले, की कोण कधी लोळण घेईल याचा भरवसा राहिला नाही. हा सामना संपण्याची कोणतीच चिन्हे नसल्याने बहुतेक प्रेक्षक मध्यरात्रीनंतर सामना सोडून निघून गेले, आणि जे प्रेक्षक तिथेच थांबून राहले त्यांना झोप लागून गेली. सामना १०८व्या राउंडमध्ये पोहोचेपर्यंत एकमेकांना मारण्याचे त्राण दोन्ही खेळाडूंमध्ये उरलेले नसल्याने ते नुसतेच रिंगणात गोलगोल फिरत होते. ११०वा राउंड झाल्यानंतरही सामन्याचा काही निकाल लागत नाही असे पाहून अखेरीस रेफ्रीने सामाना बरोबरीत संपल्याचे जाहीर करून बक्षिसाची रक्कम दोन्ही खेळाडूंमध्ये एकसारखी वाटण्यात यावी असा निर्णय दिला.

Leave a Comment