राणी एलिझाबेथची शाही परिवाराच्या इन्स्टाग्रामवर पहिलीवहिली पोस्ट

insta
ब्रिटनची राणी एलिझाबेथ हिने नुकतेच सोशल मिडीयाच्या जादुई दुनियेमध्ये पदार्पण केले असून, लंडनमधील सायन्स म्युझियममध्ये एका प्रदर्शनासाठी आल्यानंतर शाही घराण्याशी संबंधित एक प्राचीन दस्तऐवज तिने ब्रिटीश राजपरिवाराच्या औपचारिक इन्स्टाग्राम अकाऊन्टवर ‘शेअर’ केला. राजपरिवाराचे हे औपचारिक इन्स्टाग्राम पेज अतिशय लोकप्रिय असून, याचे ४.६ मिलियनहूनही अधिक फॉलोअर्स आहेत. या विज्ञान प्रदर्शनामध्ये आजचा विद्यार्थी वर्ग शिकत असलेल्या कॉम्प्यूटर कोडींगबद्दल राणी एलिझाबेथला माहिती दिली गेली. आजची पिढी कॉम्प्यूटरचा वापर इतक्या कुशलतेने करीत असल्याचे समाधान एलिझाबेथने आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट मध्ये व्यक्त केले आहे.
insta1
राणी एलिझाबेथने इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केलेले प्राचीन दस्तऐवज म्हणजे १८४३ साली संगणकाचे जनक चार्ल्स बॅबेज यांनी इंग्लंडचे राजे आल्बर्ट आणि राणी व्हिक्टोरिया यांना लिहिलेले पत्र आहे. या पत्रामध्ये बॅबेज यांनी संगणकाचा प्रथम प्रोटोटाईप तयार केला असल्याचा उल्लेख करीत या ‘अॅनालिटीकल इंजिन’ साठी अॅडा लवलेस यांनी कॉम्प्युटर प्रोग्रॅम्स तयार केले असल्याबद्दलची माहिती राजे आल्बर्ट आणि राणी व्हिक्टोरियाला दिली होती. या प्रदर्शनामध्ये राणी एलिझाबेथने दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये वापरल्या गेलेल्या ‘एनिग्मा कोड मशीन’ची पाहणी केली. त्याचबरोबर १९८९ साली ‘वर्ल्ड वाईड वेब’ची निर्मिती करण्यासाठी टिम बर्नर्स ली यांनी वापरलेला ‘नेक्स्ट’ संगणकही राणी एलिझाबेथने पाहिला.
insta2
यापूर्वी २००८ साली जेव्हा राणी एलिझाबेथने लंडनमध्ये गुगलच्या कार्यालयाला भेट दिली होती, तेव्हा राणीच्या हस्ते युट्युब व्हिडियो अपलोड करण्यात आला होता.

Leave a Comment