या अभिनेत्रींना एका दिवसासाठी पंतप्रधान बनण्याची संधी मिळाल्यास…

actress
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने अलीकडेच, ‘एका दिवसासाठी पंतप्रधान बनल्या तर सर्वप्रथम कोणते काम कराल’ असा प्रश्न विचारला गेल्यानंतर अनेक अभिनेत्रींनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलीवूड अभिनेत्री कलकी कोचलिन हिच्या मते काही करून दाखविण्यासाठी एक दिवस पुरेसा नसला, तरी देशाच्या प्रगतीला पूरक अशा अनेक योजनांची अंमलबजावणी आपण करु असे म्हटले आहे, तर सुप्रसिद्ध अभिनेत्री रीमा कागती यांनी महिलांचे सशक्तीकरण होईल अशा योजना अंमलात आणण्याबद्दल सांगितले. त्याचबरोबर देशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी काही उपाययोजना करण्याला प्राधान्य देऊ व वैज्ञानिक प्रगतीलाही आपण प्राधान्य देऊ असे कागती यांनी म्हटले आहे.

अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने एका दिवसासाठी पंत प्रधान बनण्याचा मोका मिळाला तर महिलांचे शोषण करणाऱ्यांवर कडक कारवाई करू व सोशल मिडीयावर महिलांना अपमानित करणाऱ्यांनाही चांगलीच अद्दल घडवू असे म्हटले आहे. त्याचबरोबर कन्याभ्रूणहत्या आणि हुंडाबळीच्या विरोधातील कायदे आपण आणखी कडक करू असेही रिचाने म्हटले आहे. त्याचबरोबर शहरे आणि गावांमध्ये महिलांसाठी मुबलक शौचालये आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यालाही आपण प्राधान्य देऊ असे रिचा म्हणते. अर्चना पुरणसिंह हिने एक दिवसासाठी पंत प्रधान बनविले गेल्यानंतर भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करण्यासाठी धोरणे तयार करण्याला आपले प्राधान्य असल्याचे म्हटले आहे. तर अभिनेत्री शिवानी रघुवंशी हिने ‘डोमेस्टिक व्हायलंस’ रोखण्यासाठी आणखी कडक कायदे करण्याचे काम आपण सर्वप्रथम करू असे म्हटले आहे.

Leave a Comment