आता पाळीव प्राण्यांचाही उतरविता येणार विमा

pet
ज्यांच्या कडे पाळीव प्राणी आहेत, त्यांना आपल्या लाडक्या प्राण्यांचा विमा उतरविता येणार असून, अनेक विमा कंपन्यांनी ही सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या विम्याअंतर्गत पाळीव प्राणी आजारी असल्यास, किंवा त्याला अपघात झाल्यास त्याच्या उपचारासाठी खर्च करण्यात येणारी रक्कम ‘क्लेम’ करता येऊ शकणार आहे. दुध उत्पादनासाठी गायी, म्हशी, किंवा शेतीच्या कामी वापरण्यात येणारे बैल, अशा प्राण्यांचे विमे उतरविण्याची सोय आधीपासून उपलब्ध असून, यांचा फायदा शेतकरी बंधू घेत आहेत.
pet1
विमा कंपन्या आता ज्या पाळीव प्राण्यांच्या करिता विमा उतरविण्याची सोय उपलब्ध करून देत आहेत त्यांमध्ये कुत्रे, मांजरी, पक्षी, शेळ्या-मेंढ्या, बकऱ्या, घोडे, ससे आणि हत्ती या प्राण्यांचा समावेश आहे. काही विमा कंपन्या केवळ कुत्र्यांसाठी विमा उपलब्ध करून देत आहेत. विम्याच्या अंतर्गत प्राण्याला झालेला आजार, अपघात, मृत्यू किंवा प्राण्यामुळे कोणाला इजा झाल्यास त्याची नुकसानभरपाई करण्यासाठी खर्च होणारी रक्कम क्लेम करता येणार आहे.
pet2
पाळीव प्राण्यांचा विमा उतरविताना काही नियमांची पूर्तता करणे आवश्यक असणार आहे. प्रत्येक प्राण्याची आयुर्मर्यादा निराळी असून, त्यानुसार त्यांचा विमा केला जाणार आहे. कुत्री किंवा मांजरांचा विमा ते आठ महिन्यांचे असल्यापासून आठ वर्षांचे असेपर्यंतच्या काळादरम्यान उतरविता येणार आहे, तर गायी-म्हशींचा विमा उतरविण्यासाठी त्यांचे वय दोन ते आठ वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. हा विमा उतरविताना जनावराचे वय, प्राण्याची ओळख पटविता येईल अशी शारीरिक खूण, रंग, लिंग, प्रजाती, आणि तत्सम इतर माहिती असणारे डॉक्टरांचे सर्टिफिकेट पुरविणेही बंधनकारक असणार आहे.

Leave a Comment