मोदींची तमिळनाडू मोहीम व्हाया ‘एमजीआर’ स्टेशन!

narendra-modi
चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकाला भारतरत्न एम. जी. रामचंद्रन यांचे नाव देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. एखाद्या रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्यापुरती या घोषणेची व्याप्ती नाही. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने त्यांनी ही घोषणा केली, हे तर जगजाहीर आहे. मात्र या निमित्ताने त्यांनी तमिळ जनतेच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला आहे, हे नक्की.

कांचीपुरम जिल्ह्यातील किलम्बाक्कम येथे एका सभेत बोलताना मोदी यांनी ही घोषणा केली. तमिळ भाषा आणि संस्कृतीचे गुणगान गात ते म्हणाले, की रामचंद्रन हे तमिळनाडूतील सर्वाधिक सन्मानित व्यक्तिमत्त्व असून ते लोकांच्या हृदयात वसलेले आहेत. त्याला जोडूनच त्यांनी चेन्नईतील प्रमुख स्थानक असलेल्या स्थानकाला त्यांचे नाव देण्याची घोषणा केली. तसेच तमिळनाडूत येणाऱ्या व जाणाऱ्या विमानांमध्ये तमिळ भाषेत उद्घोषणा करण्याचेही त्यांनी जाहीर केले.

एम. जी. रामचंद्रन उर्फ एमजीआर यांच्याबाबत मोदी जे बोलले ते अक्षरशः खरे आहे. काल्पनिक गोष्टींमध्ये आपण नेहमी ‘रंकाचा राव’ झाल्याचे वाचतो. मात्र एमजीआर यांच्या रूपाने तमिळ जनतेला ती कथा प्रत्यक्षात उतरल्याचे पाहायला मिळाले. चहाच्या मळ्यातील एका छोट्याशा खोलीत जन्माला आलेला एक गरीब मुलगा पुढे जाऊन सुपरस्टार होतो आणि थेट राज्याच्या सिंहासनावर आरूढ होतो, ही कथा एमजीआर यांच्या रूपाने जीवंत झाली. एखाद्या रेल्वेस्थानकाला नाव मिळणारे कदाचित ते पहिले अभिनेते किंवा राजकारणी असतील.

मरूथुर गोपालन रामचंद्रन हे त्यांचे पूर्ण नाव. मात्र एमजीआर या नावानेच ते ओळखले जात व आजही ओळखले जातात. सत्यभामा आणि गोपाळ मेनन ही त्यांच्या आईवडिलांची नावे. दिनांक 17 जानेवारी 1917 रोजी श्रीलंकेतील कँडी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ गाव केरळमध्ये होते आणि त्यांचे वडील गोपाळ मेनन हे मॅजिस्ट्रेट होते. एमजीआर यांच्या जन्मानंतर थोड्याच दिवसांनी त्यांचे वडील गोपालन यांचे निधन झाले. त्यामुळे बालपणीच एमजीआर आई सत्यभामा आणि थोरला भाऊ चक्रपाणी यांच्यासह तमिळनाडू येथील कुंभकोणम या गावी आले व तेथेच स्थायिक झाले. गरिबीमुळे त्यांचे शिक्षण प्राथमिक शाळेच्या पुढे जाऊ शकले नाही.

सात वर्षांच्या कोवळ्या वयात एमजीआर यांनी मदुराई बॉईज ड्रामा कंपनीत नोकर म्हणून प्रवेश केला. अखेर 1936 मध्ये त्यांना ‘सती लीलावती’ या सिनेमात एक छोटीशी भूमिका मिळाली. मात्र महत्त्वाची भूमिका मिळण्यासाठी त्यांना आणखी 11 वर्षे संघर्ष करावा लागला. इ.स. 1947 मध्ये त्यांना ‘राजकुमारी’ या सिनेमात प्रमुख भूमिका मिळाली. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. गरिबांचा तारणहार, संरक्षक, रॉबिनहूड अशा भूमिका ही त्यांची खासियत बनली. इ.स. 1977 पर्यंत एमजीआरनी सुमारे 140 चित्रपटातून भूमिका केल्या. त्यांचे काही चित्रपट अण्णा दुराई आणि करुणानिधी यांसारख्या राजकीय नेत्यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित होते. जवळ जवळ 25 वर्षे ते तमिळ चित्रपटसृष्टीचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ते वावरले. त्यांचे चाहते त्यांना ‘इदय देवम’ (हृदयातील देव) असे म्हणत.

एमजीआर बरोबर जानकी, पद्मिनी, सरोजादेवी, लता आणि जयललिता वगैरे प्रसिद्ध अभिनेत्रींशी त्यांची जोडी जमली. यातील जानकी यांच्याशी त्यांनी विवाह केला. तर जयललिता यांनी एमजीआर यांच्या पक्षात काम केले.

इ. स. 1953-1954 मध्ये ते द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) या पक्षाचे सक्रीय सभासद झाले. इ. स. 1962 मध्ये ते द्रमुक तर्फे विधानसभेवर प्रथम निवडून आले. मात्र करुणानिधी यांच्याशी मतभेद झाल्यामुळे 1972 मध्ये एमजीआरनी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम’ (अण्णा द्रमुक) या पक्षाची स्थापना केली आणि 1977 च्या निवडणुकीत विजय मिळवून ते मुख्यमंत्री झाले.

मुख्यमंत्री असताना त्यांनी व्यापक धोरण आखून तमिळनाडूची सुधारणा घडवून आणली. लोकांची गरिबी व दुख दूर करण्यासाठी काही योजना अंमलात आणण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. त्यासाठी सुमारे 200 कोटी रूपयांच्या योजना जाहीर केल्या. शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन मोफत द्यावे, ही योजना त्यांनी प्रथम आणली. त्यामुळे शाळेची उपस्थिती वाढली व साक्षरतेचे प्रमाण वाढले. दारूबंदीचे धोरण त्यांनी कडकपणे अंमलात आणले.

एमजीआर यांचे निधन 1988 मध्ये झाले. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते मुख्यमंत्री होते. त्यांच्या हयातीत कोणीही त्यांचा पराभव करू शकले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर दुखावेग असह्य होऊन त्यांच्या 30 अनुयायांनी आत्महत्या केली, यावरून त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येऊ शकते. त्यांच्या मृत्यूला 30 वर्षे उलटल्यानंतरही त्यांची लोकप्रियता अफाट आहे. म्हणूनच अण्णा द्रमुक पक्षाच्या मुखपत्राचे नाव नमदु एमजीआर (आपले एमजीआर) असे आहे. त्यामुळे दक्षिणेत मतांची बेगमी करणाऱ्या मोदी यांनी त्यांचे नाव स्थानकाला देणे अजिबात आश्चर्याचे नाही

Leave a Comment