लंडन प्रशासनाची ‘जंक फूड’च्या जाहिरातींवर बंदी

junk
लंडन येथे सर्व सार्वजनिक वाहनांवर अनेक लोकप्रिय फूड ब्रँड्सच्या जाहिराती सर्रास आढळत असत. आता मात्र अशा प्रकारच्या जाहिराती सार्वजनिक वाहनांवर, मुख्यतः लंडन मेट्रोच्या कोचेसवर, टॅक्सींवर, किंवा सार्वजनिक बसेसवर लावण्यास प्रशासनाने प्रतिबंध केला आहे. इतकेच नव्हे तर बस आणि ट्रेन स्थानके, टॅक्सीस्थानके या ठिकाणी ही या जाहिराती प्रदर्शित करण्यास मनाई करण्यात आली आहे. लंडन शहरामध्ये पिझ्झा, बर्गर सारखे फास्ट फूड अतिशय लोकप्रिय असून या अन्नपदार्थांचे सातत्याने सेवन केल्याने लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढीला लागले आहे. ‘चाईल्ड ओबेसिटी’ हा सध्या लंडन प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनला असल्याने मुलांना आकर्षित करणाऱ्या फास्ट फूडच्या जाहिराती निदान सार्वजनिक वाहनांवर दिसू नयेत याची काळजी घेण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने केला जात आहे. लंडनमध्ये सार्वजनिक वाहने हे प्रवासाचे लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरले जाणारे माध्यम आहे.
junk1
लंडनमध्ये दहा ते अकरा या वयोगटातील सुमारे चाळीस टक्के मुले ‘ओबीस’, म्हणजेच अति लठ्ठ आहेत. ही सरासरी युरोपातील इतर देशांच्या मानाने पुष्कळ जास्त आहे. लहानपणीच लठ्ठपणा आल्याने या मुलांना भविष्यात आरोग्याशी निगडित अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागण्याचा धोका उत्पन्न होण्याची शक्यता असते. लठ्ठपणा जर वेळीच नियंत्रणात आणला नाही, तर मधुमेह, हृदयरोग, आणि अनेक तऱ्हेचे कर्करोग उद्भविण्याचा धोका ही असतो. हा धोका लक्षात घेऊनच जंक फूडच्या जाहिराती सार्वजनिक वाहनांवर प्रसिद्ध न केल्या जाण्यासंबंधी नवीन नियमांची अंमलबजावणी केली जात आहे.
junk2
एका संशोधनाच्या अनुसार जंक फूडच्या जाहिराती वारंवार पहावयास मिळत असल्याने, तसेच हे अन्नपदार्थ जाहिरातीमध्ये अतिशय आकर्षक रीतीने प्रदर्शित केले जात असल्याने साहजिकच हे पदार्थ चाखून पाहण्याचा मोह लहान मुलांनाच काय, तर मोठ्यांनाही आवरत नाही. त्यामुळे या जाहिरातींच्या मोहाला बळी पडून वारंवार खाल्ले जाणारे जंक फूड लठ्ठ्पणास कारणीभूत ठरते. हीच बाब लक्षात घेऊन मैदा, साखर, इतर प्रिझर्व्हेटिव्हज् अशा प्रकारचे पदार्थ वापरून बनविल्या जाणाऱ्या जंक फूडच्या जाहिराती सार्वजनिक वाहनांवरून कायमस्वरूपी हटविण्याची मोहीम लंडन प्रशासनाने हाती घेतली आहे.

Leave a Comment