स्वतःच्या दाढीपायी गमवला स्वतःचा जीव !

beard
‘ब्राउनाऊ आम इन’ हे ऑस्ट्रियातील लहानसे शहर नाझी तानाशाह हिटलर याचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहेच, पण हे त्याशिवाय हे शहर हान्स स्टायनिंजर यांच्यामुळेही ओळखले जाते. येथे असलेल्या सेंट स्टीफन्स चर्चमध्ये लांबलचक दाढी असलेला स्टायनिंजर यांचा पुतळा त्यांच्या समाधीवर उभा आहे. स्टायनिंजर हे एके काळी ‘ब्राउनाऊ आम इन’चे नगराध्यक्ष असून, त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते अतिशय लोकप्रिय नेते ठरले होते. स्टायनिंजर यांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी एक वैशिष्ट्य होते, ते म्हणजे अगदी पायांपर्यंत रुळणारी त्यांची लांबलचक दाढी.

हान्स स्टायनिंजर हे सोळाव्या शतकामध्ये ‘ब्राउनाऊ आम इन’ चे नगराध्यक्ष असून, त्यांची ही जबाबदारी त्यांना अतिशय प्रिय होती. अत्यंत कर्तव्यनिष्ठपणे ही जबाबदारी ते पार पडत असत. म्हणूनच नगराध्यक्ष म्हणून त्यांची लोकप्रियताही मोठी होती. पण स्टायनिंजर यांना आपल्या या जबाबदारीहूनह अधिक प्रिय अशी एक वस्तू होती, ती म्हणजे त्यांची भली मोठी दाढी. स्टायनिंजर आपली पायांपर्यंत रुळणारी दाढी गुंडाळी करून आपल्या खिशामध्ये भरून ठेवत असत.

स्टायनिंजर यांची तब्बल चार फुट लांबीची दाढी त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वाची छाप इतरांवर पाडत असली, तरी अखेरीस याच दाढी पायी स्टायनिंजर यांना आपले प्राण गमवावे लागले. एरव्ही स्टायनिंजर आपली दाढी पायात येऊन अडखळायला होऊ नये म्हणून त्याची गुंडाळी करून आपल्या कपड्यांच्या खिशामध्ये ठेवत असत. पण एक दिवस गावामध्ये अचानक मोठी आग भडकली. अनेक इमारती भस्मसात होऊ लागल्या. नक्की काय झाले आहे हे पाहायला स्टायनिंजरही धावतच निघाले, त्या गडबडीत त्यांची दाढी गुंडाळी करून खिश्यामध्ये ठेवण्यास ते विसरले.

घाईगडबडीत जिने उतरत असताना स्टायनिंजरची दाढी त्यांच्या पायात आली आणि त्यांचा तोल गेला. इतक्या उंच जिन्यावरून गडगडत खाली पडल्यामुळे स्टायनिंजर यांचा तत्काळ मृत्यू झाला. आज स्टायनिंजर हयात नसले, तरी त्यांना अतिशय प्रिय असलेली दाढी मात्र आजही ‘ब्राउनाऊ आम इन’ येथील ‘हेरझोग्झबर्ग’ येथील वस्तूसंग्रहालयामध्ये ठेवली असून, ती पाहण्याची मुभा पर्यटकांना आहे.

Leave a Comment