इतरांची झोपमोड करणाऱ्या प्रवाश्याला घडविली सहप्रवाश्यांनी अद्दल

travel
प्रवास बसचा असो, ट्रेनचा असो, किंवा विमानाचा असो, आपल्या वर्तनाने इतर सहप्रवाश्यांना हैराण करून सोडणारे यात्रेकरू आपण अनेकदा पाहिले असतील. अशा वेळी प्रवाश्यांनी समजूतदारपणा दाखविला तर मामला फारसा बिघडत नाही, पण एखाद्या प्रवाश्याचे वर्तन सहन न होऊन जर सहप्रवासी मंडळींचा संयम संपला तर ही मंडळी बस, ट्रेन किंवा विमान, जिथे असतील त्या ठिकाणाला कुरुक्षेत्राचे स्वरूप येण्यास फारसा वेळ लागत नाही. त्यातून कोणी समजूतदारपणा दाखवून मध्यस्थी केली तर ठीक, नाही तरी ही भांडणे विकोपाला जाऊन अगदी पोलीस बोलाविण्याइतपत वेळ आल्याचे अनेक किस्से आपण नेहमीच ऐकत असतो.
travel1
अशाच प्रकारची घटना काही दिवसांपूर्वी बिहारमधल्या दरभंगाला जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये घडली. या ट्रेनने प्रवास करणारा रामचंद्र नामक यात्रेकरू इतक्या मोठमोठ्याने घोरत होता, की त्यामुळे इतर प्रवाश्यांना झोप मिळणे कठीण होऊन बसले. रामचंद्रच्या सोबत प्रवास करीत असलेल्या इतर यात्रेकरूंनी त्यांना वारंवार जागे केल्यानंतर त्यांचे घोरणे तात्पुरते बंद होत असे, पण त्यांना जरा झोप लागताच त्यांचे मोठ्याने घोरणे पुन्हा सुरु होई. अखेरीस इतर यात्रेकरुंचा संयम संपला आणि त्यांनी रामचंद्र यांना जागे करून उरलेला सर्व प्रवास जागे राहून पार पाडण्याची ताकीद दिली.
travel2
प्रकरण एवढ्यावर थांबले नाही, तर रामचंद्र जागे राहतात किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी इतर सहप्रवाश्यांनी आपापसात वाटून घेतली. काही यात्रेकरू रामचंद्र यांच्यावर लक्ष ठेऊन असे पर्यंत इतरांनी झोप काढून घ्यायची, असे करता करता इतर यात्रेकरूंनी आळीपाळीने झोप काढून घेतली. मध्यंतरी एका स्थानकावर तिकीट इन्स्पेक्टर ट्रेनमध्ये आल्यानंतर त्यांनाही घडला प्रकार समजला. इतर प्रवाश्यांनी जबरदस्तीने जागे ठेवल्याबद्दल खरे तर रामचंद्र तक्रार करू शकत होते, पण त्यांनी तसे करण्यास नकार देत आपल्यामुळे इतर प्रवाश्यांची झोप अपुरी राहिल्याबद्दल सर्वांची माफी मागितली. इतके होईपर्यंत वातावरणातील तणाव निवळला होताच, शिवाय जागे राहण्याकरिता रामचंद्र इतर यात्रेकरूंच्या सोबत गप्पा मारू लागले असल्यामुळे प्रवास संपेपर्यंत सर्वांची आपापसात मैत्रीही झाली होती.

Leave a Comment