हे आहे मुंबईतील आगळे वेगळे ‘कार्डबोर्ड कॅफे’

cafe
एके काळी ‘कॅफे’ म्हटले की चहा-कॉफी, थोडेफार स्नॅक्स, अशी पोटपूजा ज्या ठिकाणी करता येते असे एक ठिकाण, अशी साधी सोपी परिभाषा असे. पण आता काळ बदलला तसे इतर गोष्टींच्या बरोबरच कॅफेचे रूपही बदलले. आताच्या काळामध्ये कॅफे हे केवळ चहा-कॉफी आणि खाद्यपदार्थ मिळणारे ठिकाण राहिले नसून, ही जुनी ट्रेंड झपाट्याने पालटली आहे. आताच्या काळामध्ये तरुणाईच्या ‘कॉफी डेट्स’ पासून ते वयस्क मंडळींसाठी ‘गेट टुगेदर्स’ आयोजित करण्याच्या निमित्ताने कॅफे खूपच लोकप्रिय ठरू लागले आहेत. म्हणूनच ग्राहकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने अनेक कॅफेंनी आपले जुने रूप पालटून नवा साज ल्यायला आहे. त्यामुळे कॅफेच्या सजावटीपासून ते तेथील बैठक व्यवस्था, तिथे मिळणारे खाद्यपदार्थ हे एखाद्या ‘थीम’ वर आधारित असण्याचा ट्रेंड अलीकडे जास्त लोकप्रिय होत आहे. अगदी ‘व्हिंटेज’ पासून ते ‘आर्टिस्टिक’ अशा अनेक थीम्स आजकालच्या कॅफेंमध्ये पहावयास मिळत असतात. थोडक्यात सांगायचे झाले, तर आता एखाद्या कॅफेची लोकप्रियता त्या ठिकाणी मिळणाऱ्या उत्तम पदार्थांसोबतच तिथले डेकोर, ‘अँबियन्स’, सर्व्हिस या गोष्टींवरही प्रामुख्याने अवलंबून असते.
cafe1
मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका कॅफेची ‘थीम’ हटके आहेच पण त्याचबरोबर ही थीम ‘इको फ्रेंडली’ देखील आहे. त्यामुळे हे कॅफे डिझाईन करताना प्लास्टिकच्या वापराला अजिबात फाटा देऊन संपूर्णपणे रिसायकल करता येण्याजोग्या कार्डबोर्डचा वापर येथे प्रामुख्याने केला गेला असून, या कॅफेचे नावही ‘कार्डबोर्ड’ कॅफे असे आहे. नवीन संकल्पनेच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्याबरोबर कोणतेही ‘कार्बन फुटप्रिंट’ मागे रहाणार नाही याची पुरेपूर काळजी या कॅफेचे डिझाईन तयार करीत असताना घेतली गेली आहे.
cafe2
या कॅफेच्या इंटिरियर्स पासून लँडस्केपिंग, फर्निचर, लाईट फिक्श्चर्स, मेन्यू कार्ड, कटलरी पर्यंत सर्व काही कार्डबोर्डचा कल्पक वापर करून तयार करण्यात आले आहे. ‘कार्डबोर्ड’ कॅफेचे डिझाईन नुरू करीम या आर्किटेक्टचे असून, ही संकल्पना अमित आणि भावना धनानी या दाम्पत्याने प्रत्यक्षात उतरविली आहे. कार्डबोर्ड शंभर टक्के रिसायकल करता येत असून हा टिकाऊ, वजनाला हलका, आणि उत्तम इंस्यूलेटर आहे. या कॅफेच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वी डिझायनर्सच्या टीमने आधी एक ‘प्रोटो टाईप’ तयार केला. त्याद्वारे कार्डबोर्डचा वापर सर्वप्रकारे योग्य आणि सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर मगच प्रत्येक्ष कॅफेच्या डिझाईनिंगला सुरुवात करण्यात आली. संपूर्णपणे कार्डबोर्डने बनविला गेलेला हा कॅफे आता ग्राहकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे.

Leave a Comment