ब्रिटनच्या राणीच्या हातावरील काळे-निळे डाग पाहून नागरिकांमध्ये तिच्या प्रकृतीविषयी चिंता

elizabeth
जॉर्डनचे राजे अब्दुल्ला (दुसरे) आणि त्यांची पत्नी रैना यांनी नुकतीच ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांची, त्यांच्या लंडनमधील औपचारिक निवासस्थानी, बकिंगहॅम पॅलेस येथे भेट घेतली. या भेटीच्या प्रसंगी राणी एलिझाबेथ यांच्या कन्या प्रिन्सेस अॅन देखील उपस्थित होत्या. या भेटीची छायाचित्रे आणि व्हिडियो सोशल मिडीयावरही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. वयाच्या ९२व्या वर्षी देखील राणी एलिझाबेथ यांचा कामाचा उत्साह दांडगा असला, तरी या औपचारिक भेटीनिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये राणी एलिझाबेथच्या डाव्या हातावर मोठे काळे निळे डाग स्पष्ट दिसून येत असल्याने ही छायाचित्रे पाहून ब्रिटनच्या नागरिकांमध्ये राणीच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त होताना पहावयास मिळत आहे.

राणीच्या हातांवर दिसून येणाऱ्या या डागांच्या बद्दल अनेकांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून चिंता व्यक्त करीत राणीसाठी दीर्घायुष्य आणि उत्तम स्वास्थ्याची कामना केली आहे. इतके वय झाल्यानंतरही राणी एलिझाबेथ आपल्या औपचारिक जबाबदाऱ्या पार पडत असल्या, तरी यांपैकी अनेक जबाबदारऱ्या त्यांनी आता आपल्या परिवारजनांच्या स्वाधीन केल्या आहेत. त्यामुळे राणीच्या स्वतःच्या औपचारिक जबाबदाऱ्या पुष्कळ अंशी कमी झाल्या आहेत. यांमध्ये प्रामुख्याने राणीचे थोरले पुत्र प्रिन्स चार्ल्स, त्यांची पत्नी कॅमिला, प्रिन्स विलियम, केट मिडलटन, प्रिन्स हॅरी, मेघन मार्कल आणि प्रिन्सेस अॅन यांनी राणी एलिझाबेथच्या अनेक औपचारिक जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत.

Leave a Comment