हवाई दलाचे स्पष्टीकरण – एक सणसणीत चपराक

BS-dhanoa
दहशतवाद्याच्या मुद्द्यावर कोणीही राजकारण करू नये आणि देशहिताच्या संदर्भात घाणेरडे राजकारण खेळू नये, असे आपल्याकडे सगळेच राजकारणी बोलतात. परंतु त्याच्यावर अंमल कोणीच करत नाही. दर वेळेस दहशतवादी घटना झाल्यानंतर तिचा राजकीय फायदा घेण्यासाठी सगळेच जण अहमहमिकेने पुढे येतात. अशा वेळेस हे राजकारणी सगळी मर्यादा धाब्यावर बसवितात आणि असे काही बोलतात, की असे लोक आपले प्रतिनिधी म्हणून मिरवितात याची आपल्यालाच शरम वाटते. पुलवामा हल्ल्याच्या उत्तरादाखल भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात शिरून केलेल्या ऐतिहासिक कारवाईच्या बाबतीत नेमके हेच घडताना दिसत आहे.

भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील पक्षांनी या कारवाईवरच शंका उपस्थित केली आहे, तर हवाई दलाने केलेल्या कामगिरीचे श्रेय घेण्यासाठी भाजपनेही जोरदार फिल्डिंग लावली आहे. अगदी आठवड्याभरापूर्वी आपले सर्व नेते अगदी मानभावीपणे बोलत होते आणि दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी सर्व देश एक असल्याचे छातीठोकपणे सांगत होते. मात्र एका आठवड्याच्या आत त्यांनी आपला खरा रंग दाखवायला सुरूवात केली आहे. सगळी लाज-लज्जा बाजूला ठेवून त्यांनी या मुद्द्याचे राजकारण करायला सुरूवात केली आहे.

हवाई दलाने आपली कारवाई केली 26 फेब्रुवारी रोजी पहाटे. त्यानंतर कॉंग्रेससहित सर्व विरोधी पक्षांनी कसाबसा एक आठवडा संयम बाळगला. त्यानंतर सर्वात आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तोंड उघडले. या कारवाईत एकही व्यक्ती मरण पावली नाही असा आरोप करून त्यांनी सरकारने याबाबतचे तपशील जाहीर करावेत, अशी मागणी केली. त्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांचा हवाला दिला. त्यानंतर पाकिस्तानची तळी उचलायला सदैव सिद्ध असलेले नवज्योतसिंग सिद्धू यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला. हवाई दलाने खरोखर दहशतवाद्यांवर कारवाई केली का केवळ बालकोटमधील झाडे उद्ध्वस्त केली, असा सवाल त्यांनी केला. त्यानंतर दिग्विजय सिंह, सीताराम येचुरी आणि कपिल सिब्बल अशा विविध पक्षांच्या नेत्यांची या कारवाईला संशयाच्या जाळ्यात ओढण्याची स्पर्धा सुरू झाली. प्रशांत भूषण आणि अन्य पुरोगामी कार्यकर्त्यांचीही त्यांना यात भक्कम साथ होती.

विरोधी पक्ष हा आततायीपणा करत असताना भाजपही काही मागे राहिला नाही. भाजपच्या वतीने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. मुंबईत2008मध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा हवाई दलाने सर्जिकल स्ट्राईक करण्याची मागणी केली होती. मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने त्याला परवानगी दिली नव्हती, असे ते म्हणाले. इतकेच नाही तर राफेल विमाने असती तर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासारख्या वीराला पाकिस्तान अटक करू शकला नसता, असेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहही अतिउत्साहात बोलून गेले, की बालकोटमधील कारवाईत 250 दहशतवादी मारले गेले. त्यावरूनही बरीच भवती न भवती झाली.

अखेर हा सगळा गोंधळ निस्तरण्यासाठी हवाई दलप्रमुख एअर मार्शल बी. एस धनोआ यांना माध्यमांशी संवाद साधावा लागला. हवाई दलाच्या कारवाईत किती दहशतवादी मारले गेले, हे सांगता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले. यावेळी त्यांनी उच्चारलेले एक वाक्य खूप महत्त्वाचे आहे – हवाई दलाचे काम दहशतवाद्यांना मारणे हे आहे, त्यांचे मृतदेह मोजणे हे नाही.

हवाई दलप्रमुखांचे हे वाक्य म्हणजे सर्व संशयवादी आणि श्रेयवाद्यांना एक सणसणीत चपराक आहे, डोळ्यात घातलेले झणझणीत अंजण आहे. हवाई दलाचे काम नियत लक्ष्य उद्ध्वस्त करणे हे आहे, बाकी अन्य कशातही हवाई दलाला रस नाही हे त्यातून स्पष्ट झाले आहे. त्या प्रमाणे हवाई दल पाकिस्तानला आपली ताकद दाखवून परत आले. आपल्या कर्तृत्वाचा झेंडा हवाई दलाच्या विमानांच्या पाकिस्तानच्या हद्दीत रोवला. म्हणून तर शेपटीवर पाय दिलेल्या सापाप्रमाणे चवताळून त्यांची विमाने इकडे आली. त्यातही त्यांना तोंडावर आपटावे लागले. हवाई दलाची कारवाई ही 40 विरुद्ध 400 वगैरे अशी आकडेमोड करण्यासारखी नव्हती. ती एक सुरूवात होती आणि अजून अशा अनेक कारवाई होणार आहेत. “आमची कारवाई अद्याप चालू आहे,” असे धानोआ यांनी सांगितले यातच ते आले.

राजकारणी वाटेल ते बोलतील, परंतु लोकांनी त्याला भूलता कामा नये. हवाई दलासारखे कार्यक्षम, निष्पक्ष आणि सजग दल आहे म्हणून देश सुरक्षित हातात आहे. एअर मार्शल धानोआ यांनी संयत भाषेत जे कान पिळले आहेत, त्याचा मथितार्थ हा आहे.

Leave a Comment