एअर इंडिया – जेवण चोरीपासून ‘जय हिंद’पर्यंत

air-india
प्रत्येक देशाच्या काही सरकारी संस्था असतात आणि त्या संस्थांवरून जगभरात त्या देशाची ओळख असते. भारताच्या संदर्भात आकाशवाणी, भारतीय रेल्वे, पोस्ट इत्यादी संस्था या वर्गात मोडतात. त्याही कोणत्याही देशाची सरकारी विमान कंपनी ही त्या देशाचे मानबिंदू असते. भारतातील अशी कंपनी म्हणजे एअर इंडिया. गेली कित्येक दशके भारतीय आकाशात जवळजवळ एकाधिकार असलेल्या एअर इंडियाने आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अमेरिकेची पॅन अॅम, जर्मनीची लुफ्तहंसा किंवा ब्रिटनच्या ब्रिटीश एअरवेज यांसारख्या कंपनीच्या बरोबरीने एअर इंडिया ही भारताचे प्रतीक बनली आहे. महाराजा हे तिचे प्रतीक कित्येक वर्षे देश-परदेशात ठाण मांडून होते.

त्यामुळेच एअर इंडियाच्या प्रत्येक उड्डाणात उद्घोषणा करण्यापूर्वी ‘जय हिंद’ ही घोषणा करण्यात येईल, ही बातमी आली तेव्हा त्यात वावगे वाटायचे काही कारण नाही. एअर इंडियाचे वैमानिक यापुढे आपल्या प्रत्ये क उड्डाणाच्या घोषणेनंतर जय हिंद म्हणणार आहेत. एअर इंडियाकडून तसे आदेश देण्यात आले आहेत. कंपनीच्या विमानाच्या चालक दलातील सर्व सदस्य प्रत्येक नव्या उड्डाणाच्या घोषणेनंतर जय हिंद म्हाणतील, असे सोमवारी एअर इंडियाचे ऑपरेशन संचालक अमिताभ सिंह यांनी सांगितले.

एअर इंडियाचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यांनी वैमानिकांना असे निर्देश दिले होते. लोहानी यांच्या म्हषणण्यानुसार वैमानिकांनी जय हिंद म्हटल्याने प्रवाशांवर चांगला प्रभाव पडू शकतो. गेल्या काही दिवसांत भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. देशभरात देशभक्तीची काहीशी लाट आली आहे. त्यातच हवाई दलाने भरीव कामगिरी करून पाकिस्तानी हद्दीत जाऊन दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे. म्हणून त्याला महत्त्व आले आहे. (प्रत्यक्षात एअर इंडिया आणि हवाई दलाचा थेट संबंध नसला तरी!)

मात्र देशभक्ती केवळ घोषणा देऊन होत नसते. ज्या दिवशी ‘जय हिंद’च्या या घोषणेची बातमी आली त्याच दिवशी एअर इंडियाशी संबंधित आणखी एक बातमी आली. कंपनीच्या विमानातील जेवण आणि अन्य वाण सामान चोरल्याबद्दल एअर इंडियाच्या चार कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. ज्या लोहानी यांनी जय हिंदचा आदेश जारी केला, त्यांच्याच काळात ऑगस्ट 2017 मध्ये एक परिपत्रक काढण्यात आले होते. त्यात म्हटले होते, की विमान गंतव्यस्थानी पोचल्यानंतर अनेकदा ग्राऊंड स्टाफ आणि अधिकारी उरलेले अन्नपदार्थ आणि वाण सामान खासगी वापरासाठी घेऊन जातात. या कामात कोणी अधिकारी गुंतलेला असल्यास त्याला निलंबित करण्यात यावे, असे त्या परिपत्रकात म्हटले होते.

त्यानुसार झालेल्या कारवाईत केटरिंग विभागातील दोन आणि केबिन क्रूमधील दोन कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. केटरिंग विभागातील एक सहाय्यक व्यवस्थापक आणि वरिष्ठ सहाय्यक चोरीच्या आरोपावरून दोषी आढळले होत. तेव्हा त्यांना क्रमश: 63 दिवस आणि तीन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच गेल्या वर्षी नवी दिल्ही ते सिडनीदरम्यान फ्लाईटमधील केबिन कर्मचाऱ्यांना तंबी देऊन देशांतर्गत उड्डाणात स्थानांतरित करण्यात आले.

हे हाल आहेत आपल्या राष्ट्रीय विमान वाहकाचे. ज्या विमानातील कर्मचारी ‘जय हिंद’ची घोषणा देणार आहेत, त्याच विमानातील कर्मचारी प्रवाशांचे जेवण चोरतात!

नागरी विमानन महासंचालनालयाने (डीजीसीए) 2017 मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एयर इंडियाच्या प्रत्येक एक लाख प्रवाशांमागे 19 तक्रारी आल्या होत्या. प्रवाशांच्या सर्वाधिक तक्रारी एअर इंडियाच्या ग्राहक सेवेबाबत होत्या. एकूण तक्रारींमध्ये त्यांचे प्रमाण 30 टक्के एवढे होते आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबाबत 6.6 टक्के आल्या, असे डीजीसीएने म्हटले होते. एअर इंडियावर सध्या 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे कर्ज आहे. कंपनी गेली कित्येक वर्षे तोट्यात चालत असून सरकार ती विकण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र तिला खरेदीदार मिळत नाहीत. त्यात फुकटेगिरीची भर पडली आहे. देशभरातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या चार्टर्ड फ्लाईटसाठी भाडे म्हणून कंपनीला केंद्र सरकारकडून 1146.86 कोटी रुपये येणे बाकी आहे.

म्हणजे भारताची चांगली प्रतिमा ठसवण्यासाठी एअर इंडियाचे वैमानिक व कर्मचारी ‘जय हिंद’ म्हणणार असतील, तर ते स्वागतार्हच आहे. मात्र ही केवळ वरवरची रंगरंगोटी झाली. खरोखर भारतीय कंपनी म्हणून सर्व भारतीयांना ती अभिमानास्पद व्हायची असेल तर खूप खोलवर प्रयत्न करावे लागतील. ‘जय हिंद’!