भारतातील हे धबधबे ठरत आहेत पर्यटकांसाठी आकर्षण

waterfall
भारताला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. त्यामुळे येथील अनेक ठिकाणे जरी पर्यटकांसाठी सातत्याने आकर्षणाचे केंद्र ठरत असली, तरी भारतामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जी अजूनपर्यंत काहीशी अज्ञातच राहिली आहेत. आजच्या काळामध्ये या ठिकाणी पर्यटन काहीसे वाढीला लागले असून, या ठिकाणांकडे आता पर्यटकांचे लक्ष वळू लागले आहे. या ठिकाणांमध्ये भारतामध्ये अनेक राज्यांतील काही धबधब्यांचा देखील समावेश आहे. या धबधब्यांना वर्षभर भरपूर पाणी राहत असल्याने बहुतेक वर्षभर केव्हाही सोयीचे दिवस आणि हवामान पाहून या ठिकाणांना भेट देता येऊ शकते.
waterfall1
मध्य प्रदेश येथील जबलपूरच्या जवळ असणारे ‘धुवाधार वॉटरफॉल्स’ येथे आताच्या काळामध्ये पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. धबधब्याच्या पाण्यामध्ये डुंबण्यापासून, ते येथे उपलब्ध असणाऱ्या गंडोला राईड्सच्या द्वारे नर्मदेचे नयनरम्य दर्शन घडते. धुवाधार धबधब्याच्या जवळच असलेले बार्गी धरण, राणी दुर्गावती वस्तूसंग्रहालय, कान्हा अभयारण्य, इत्यादी जवळपास असलेली अन्य प्रेक्षणीय स्थळे पाहता येण्यासारखी आहेत. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यानचे दिवस येथे येण्यासाठी उत्तम आहेत. थ्रिसुर येथील ‘अथिरापल्ली वॉटरफॉल्स’ केरळमधील सर्वात मोठा धबधबा समजला जातो. या धबधब्याला भारताचा ‘नायगारा’ म्हणूनही ओळखले जाते. पश्चिमी घाटातल्या चालाकुडी नदीचे पाणी या धबधब्यामध्ये वाहते. अथिरापल्लीच्या धबधब्यापासून पाच किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या वाझाचलच्या धबधब्यालाही पर्यटक आवर्जून भेट देत असतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या धबधब्यांना भरपूर पाणी असून, जुलै ते नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यानचा काळ येथे जाण्यासाठी उत्तम समजला जातो.
waterfall2
छत्तीसगड मधील बस्तर येथे असणाऱ्या ‘चित्रकुट वॉटरफॉल्स’ला उन्हाळ्यामध्ये पाणी थोडे कमी असले, तरी पावसाच्या दिवसांमध्ये हा धबधबा दुथडी भरून वहात असतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या धबधब्याच्या आसपासचा परिसर देखील हिरवागार होत असल्याने या दिवसांमध्ये पर्यटकांची येथे मोठी गर्दी होत असते. ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या दरम्यानचा काळ येथे जाण्यासाठी उत्तम आहे. मनाली येथील ‘राहाला वॉटरफॉल्स’ मनाली गावापासून सुमारे सोळा किलोमीटर अंतरावर असून, साडे आठहजार फुटांच्या उंचीवरून हा धबधबा खाली कोसळतो. येथे पोहोचण्यासाठी रोहतांग पासकडे जाणाऱ्या रस्त्याने मार्गक्रमण करावे लागते. गर्द वनराईने वेढलेला असा हा अतिशय सुंदर धबधबा आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी डोंगरांमधील अवघड वाटा पार कराव्या लागतात, किंवा ज्यांना लांबवर चालणे शक्य नसते त्यांच्यासाठी घोड्यावर बसून जाण्याचा पर्यायही येथे उपलब्ध आहे. मार्च ते नोव्हेंबर महिन्यांच्या मधील काळ येथे जाण्यासाठी उत्तम आहे.

Leave a Comment