पुराणांच्या अनुसार लंकाधिपती रावणाचे अपुरेच राहिले हे मानस, तत्पूर्वीच आला मृत्यू

ravan
लंकाधिपती रावण हा केवळ बलशाली आणि संपन्न लंकेचा राजा होता इतकेच नाही, तर तो एक कुशल राज्यकर्ता आणि अतिशय महत्वाकांक्षी राजाही होता. रावणाला दहा तोंडे असल्याने रावणाचा उल्लेख दशानन म्हणूनही केला जातो. पण अतिमहत्वाकांक्षा आणि अहंकारापायी रावणाच्या हातून नको ती कृत्ये घडली, तेव्हा त्याचा अंत करण्यासाठी प्रत्यक्ष भगवान विष्णूला अवतार घ्यावा लागला होता. रावणाने केलेल्या पापांमुळे त्याचा अंत झाला, हे जरी खरे असले, तरी तो अतिशय कर्तव्यपरायण आणि कुशल राज्यकर्ता होता. त्याच्या राज्यामध्ये प्रजा सुखी आणि राज्य संपन्न होते. अशा या बलाढ्य दानवराजाने आपल्या आयुष्यकालामध्ये आपल्या बळाच्या आणि त्याला प्राप्त असलेल्या दिव्य शक्तीच्या जोरावर काही कार्ये तडीस नेण्याचा निर्णय घेतला होता, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने ही कार्ये पूर्ण होऊ न शकल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे.
ravan1
पृथ्वीवरील साता समुद्रांचे पाणी गोडे, पिता येण्यासारखे बनविण्याची रावणाची महत्वाकांक्षा होती. असे घडल्याने पृथ्वीवर कधीही पाण्याची कमतरता होणार नाही अशी त्याची खात्री होती. म्हणूनच आपल्या बलाचा आणि साधनेचा वापर करून सर्व महासागरांचे पाणी त्याला पिता येण्यासारखे करायचे होते. रावण अतिशय बलशाली होता, त्याचा त्याला गर्वही होता. त्यामुळे पृथ्वीवरील समस्त जीवांनी देवतांचे पूजन न करता केवळ आपले पूजन करावे इतके बलशाली आपण व्हावे अशीही रावणाची इच्छा होती अशीही आख्यायिका आहे. त्याचबरोबर स्वर्गारोहण करण्यासाठी पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत जाणारा जिना बनविण्याची रावणाची इच्छा, त्याच्या इतर इच्छांच्या प्रमाणे अपूर्ण राहिली.
ravan2
मनुष्यांचा रक्ताचा रंग पाण्याप्रमाणे असावा अशी ही रावणाची इच्छा होती. याबाबतची आख्यायिका अशी, की जेव्हा रावण विश्वविजयी यात्रेवर निघाला, तेव्हा त्याने शेकडो युद्धे केली. कोट्यवधी मनुष्य यामध्ये मारले गेले. त्यांच्या रक्ताने समुद्र, नद्या, सरोवरे लाल होऊ लागली. पर्यावरणाचे संतुलन बिघडू लागले. यासाठी सर्व देवता रावणाला दोष देऊ लागले. म्हणूनच मनुष्याचे रक्त पाण्याप्रमाणे व्हावे यासाठी साधना करण्याचा रावणाचा मानस अपूर्ण राहिला होता. रावणाचा वर्ण सावळा होता. त्यावरून त्याला अनेक अपमानही सहन करावे लागले होते. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व मनुष्य, राक्षस गोरे व्हावेत अशीही रावणाची इच्छा असल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आहे.

Leave a Comment