पुलवामा हल्ला – इराणची भारताला साथ का?

iran
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. मात्र ही लाट फक्त देशापुरती मर्यादित राहिली नाही. अफगाणिस्तान आणि इराणसारख्या देशांनीही भारताच्या जवानांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. इराणने या हल्ल्याचा निषेध करणे फारसे आश्चर्यकारक नव्हते. मात्र इराणने यावेळी जरा कडक शब्दांतच पाकिस्तानला सज्जड दम दिला होता. त्याचे कारणही तसे विशेष होते.

पुलवामातील हल्ला ज्या दिवशी झाला, त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 13 फेब्रुवारी रोजी इराणमधील इस्फाहान शहराजवळ असाच एक आत्मघाती हल्ला झाला होता. त्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे (आयआरए) 27 जवान मारले गेले होते. आयआरएचे सैनिक एका बसमधून जात असताना स्फोटकांनी भरलेली कार बसजवळ आली आणि आतल्या व्यक्तीने तिचा स्फोट घडवून आणला. जैश-अल-अद्ल या संघटनेचा या हल्ल्यात हात असल्याचे म्हटले जाते. पाकिस्तानची सेना आणि आयएसआय ही गुप्तचर संस्था या दहशतवादी संघटनेला पैसे आणि शस्त्रे पुरवीत असतात. इराण आणि पाकिस्तान या दोन देशांत केवळ तोंडदेखले चांगले संबंध आहेत. तसे त्यांच्यात फारसे पटत नाही.

इराण हा शिया देश आहे. इराकही शिया आहे. पाकिस्तान हा सुन्नी देश आहे. तेथे केवळ सहा टक्के शिया मुस्लिम उरले आहेत. सुन्नी देश असल्यामुळे अल् कायदा, इसिसपासून तर जगभरातील सर्व दहशतवादी संघटना पाकिस्तानची मदत घेत असतात. सौदी अरेबिया हाही सुन्नी देश आहे आणि त्याचे इराणसोबत शत्रुत्व आहे. त्यामुळे पाकिस्तानला आपल्याकडे ओढण्यासाठी सौदी अरेबिया प्रयत्न करत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर लगेचच सौदी राजपुत्र महंमद बिन सुलेमान यांनी पाकिस्तान (आणि भारताचाही) दौरा केला. त्यावेळी त्यांनी “मला तुमचा राजदूतच समजा” असे पाकिस्तानला सांगितले त्यामागे हे कारण आहे.

या शत्रुत्वाचा माग घेतला असता त्याचे धागेदोरे पाकिस्तान आणि सौदी अरेबियानंतर अमेरिकेपर्यंत जातात. इराणशी अमेरिकेचे असलेले हाडवैर लक्षात घेता तेही एक कारण पाकिस्तान आणि इराणमध्ये असलेल्या दुराव्यामागे आहे. अमेरिका व त्याच्या सहकारी देशांनी पाकिस्तान आणि दहशतवादाला अनेक वर्षांपासून पोसले आहे. फेब्रुवारी 2007 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन उपाध्यक्ष डिक चेनी पाकिस्तानचे हुकूमशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांना भेटण्यासाठी पाकिस्तानला गेले होते. जनदुल्ला नावाच्या एका दहशतवादी गटाने चालविलेली इराणविरोधी मोहीम हा या भेटीचा मुख्य विषय होता. या गटाला अमेरिकेचा छुपा पाठिंबा होता. “इराणमध्ये घातक दहशतवादी हल्ल्यांच्या मालिकेसाठी जबाबदार असलेल्या जनदुल्ला गटाला अमेरिकन अधिकाऱ्यांनी गुप्तपणे 2005 पासून प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले होते,” असे त्यानंतर काही महिन्यांनी एबीसी न्यूजने एक बातमी दिली होती. या जनदुल्ला गटाला अमेरिकेकडून थेट निधी पुरवठा होत नव्हता तर तो पाकिस्तानच्या मार्फत जात होता. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल मिर्झा अस्लम बेग यांनी तेव्हा सांगितले होते, की “अमेरिका जनदुल्ला गटाला साहाय्य करते आणि इराणला अस्थिर करण्यासाठी त्याचा वापर करते.”

आजही हाच प्रकार चालू आहे. जनदुल्ला प्रमाणेच पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या जैश-ए-महंमद आणि पाकिस्तानातील अन्य दहशतवादी गटांना सौदी अरेबियासह अमेरिकेच्या अनेक सहयोगी देशांकडून पाठबळ दिले जाते. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात ही मदत कमी झाली असली तरी ती नष्ट झालेली नाही. “सौदी अरेबिया हा अल-कायदा, तालिबान, लष्कर-ए-तोयबा आणि इतर दहशतवादी गटांचा महत्त्वाचा आर्थिक साहाय्यकर्ता आहे,” असे विकीलीक्समधील एका केबलमध्ये म्हटले होते. कतार, कुवैत आणि संयुक्त अरब अमीरात यांनीही लष्कर-ए-तोयबा आणि इतर दहशतवादी गटांना मदत पुरवली आहे, असे याच केबलमध्ये म्हटले होते.

मोहम्मद बिन सलमान यांच्या नुकत्याच झालेल्या पाकिस्तान भेटीत त्यांनी इराणविरोधात आघाडीत पाकिस्तानला सामील करून घेण्याचा प्रयत्न केला होता. सौदी अरेबियाने काही वर्षांपूर्वी येमेनवर हल्ला करताना पाकिस्तानी सैन्याची मदत मागितली होती. त्यावर पाकिस्तानी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी एक ठराव मंजूर करून ही विनंती नाकारली होती. मात्र त्यानंतर आपल्या सेनेचे अतिरिक्त सैनिक सौदी अरेबियात पाठविण्याची घोषणा पाकिस्तानने केली होती.

या सर्वाचा मथितार्थ असा, की पाकिस्तान हा भारतासाठी जसा उच्छाद मांडणारा देश आहे, तसेच त्याने अफगाणिस्तान आणि इराणलाही त्रस्त केले आहे. यामुळे इराणमध्ये पाकिस्तानच्या विरोधात प्रचंड रोष आहे. पुलवामा हल्ल्याबाबत भारतीय जनतेत जसा संताप आहे, तसाच संताप इराणमध्येही आहे. इस्फाहानमधील हल्लेखोर पाकिस्तानी असून पाकिस्तानला याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा आयआरएचे कमांडर मेजर जनरल मोहम्मद अली जाफरी यांनी दिला होता. “इराण आता मूक दर्शक बनून कदापि स्वस्थ बसणार नाही. पाकिस्तानला अद्दल घडेल, असाच बदला आम्ही घेऊ. ज्यांनी या भ्याड हल्ल्यासाठी मदत केली, त्यांनाही आम्ही सोडणार नाही,” असे कमांडर जाफरी म्हणाले. त्यामुळेच इराण भारताच्या जवळ आला आहे. शत्रूचा शत्रू तो मित्र असतो तो असा!

Leave a Comment