इंटरनेटची 30 वर्षे – जादूचा दिवा की भस्मासूर?

internet
आजपासून 30 वर्षांपूर्वी मार्च महिन्यात जिनेव्हाजवळील प्रयोगशाळेत काम करणाऱ्या एका तरुण ब्रिटिश सॉफ्टवेअर अभियंत्याने जगाला नवीन वळण देणारा शोध लावला. चाकाच्या शोधानंतरचा सर्वात क्रांतिकारक शोध असे या शोधाचे वर्णन करण्यात आले. संपूर्ण मानवजातीला एका नव्या युगात घेऊन जाणारा तो शोध होता इंटरनेटचा. आज तीस वर्षानंतर त्याच संशोधकाला मात्र आपला हा शोध बदमाश लोकांनी पळवून नेल्याचे वाटत आहे आणि त्यातूनच त्याचा विनाश होईल, असेही त्याला वाटते.

टिम बर्नर्स ली असे या संशोधकाचे नाव आहे. युरोपची सामाईक प्रयोगशाळा असलेल्या युरोपियन ऑर्गनाइज़ेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च (सीईआरएन) या प्रयोगशाळेत ते कार्यरत होते. बर्नर्स-ली यांच्याकडे सीईआरएनच्या अंतर्गत डिरेक्टरीचे काम होते. जगभरातील हजारो शास्त्रज्ञ (भारतासहित) या प्रयोगशाळेशी संबंधित होते आणि त्यांना त्यांचे काम कसे अधिक सहजपणे मांडता येईल यात त्यांना जास्त रस होता. “विकेंद्री माहिती व्यवस्थापन प्रणाली” बनविणे हा त्यांचा ध्यास होता. त्यातूनच जन्म झाला इंटरनेट किंवा वर्ल्ड वाईड वेबचा.

अनेक संगणकांना एकत्र जोडण्याच्या पद्धती पूर्वीही अस्तित्वात होत्या, मात्र वर्ल्ड वाईड वेबमुळे वेबपेज एकत्रित करून ब्राउझरमध्ये ते पाहणे सोपे झाले. बर्नर्स-ली यांनी मार्च 1989 मध्ये एक मेमो लिहिला होता, त्यात इंटरनेटची कल्पना मांडली होती. त्याला मूर्त रूप आले पुढच्या वर्षी आणि 1990 च्या शेवटी सीईआरएनचा पहिला वेब नॅव्हिगेटर सर्व्हर कार्यरत झाला. हा ब्राऊझर 1991 च्या सुरुवातीला आधी सर्व संशोधन संस्थांसाठी आणि नंतर सर्वसामान्य लोकांसाठी खुला करण्यात आला.

या इंटरनेटमुळे संवादाची एक नवीच संस्कृती विकसित झाली. अनामिकता, संवादात्मकता, भौगोलिक बंधने नसणे, कमी खर्चात देश विदेशात संवाद साधणे, चुटकीसरशी हवी ती माहिती मिळणे, अशा अनेक कारणांमुळे इंटरनेट लोकप्रिय झाले. अल्लादीनचा जादूचा दिवा म्हणूनच त्याकडे पाहिले गेले. आज तर आपण इंटरनेटशिवायच्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. इंटरनेटच्या रूपाने मानवाने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले. ते मनुष्यजातीला उज्वल भविष्याकडे नेईल, अशी आशा होती. मात्र तज्ञांचे तसे नाही. ते इंटरनेला जादूचा दिवा नव्हे तर भस्मासूर या रूपात पाहतात.

ज्या बर्नर्स-ली यांना वेबचा जनक असे म्हटले जाते त्याच बर्नर्स-ली यांनी आता “वेब वाचवा” नावाची मोहीम सुरू केली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात लिस्बन येथे आंतरराष्ट्रीय वेब शिखर परिषद झाली होती. त्यात त्यांनी “वेबसाठी नवी सहमती” करण्याची मागणी केली होती. त्यांनी सर्वांना मुक्त प्रवेश देण्याची आणि गोपनीयतेचा मूलभूत अधिकार असण्याची मागणी केली होती. ऑनलाइन वादविवादामुळे ध्रुवीकरण झाले असून त्याविरुद्ध जागतिक धुरिणांनी एकत्र यावे, असे त्यांचे म्हणणे आहे.

“संपूर्ण जगभरातील लोकांचा गैरवापर करून घेण्यासाठी दुष्ट व्यक्ती आणि ट्रॉलनी इंटरनेटचे अपहरण केले आहे,” असे त्यांनी गेल्या डिसेंबरमध्ये न्यू यॉर्क टाईम्समध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले होते. डार्क वेब, खोट्या बातम्या आणि वैयक्तिक डेटा चोरी तसेच सायबर गुन्हे अशा अनेक धोक्यांची उदाहरणे त्यांनी दिली होती. इंटरनेटबाबत धोक्याची घंटा ते सतत आणि वेगवेगळ्या मंतावर वाजवत आहेत.

जानेवारी महिन्यात दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत त्यांनी या मागणीचा पुनरुच्चार केला. आजचे जागतिक समुदाय बंदिस्त वस्त्यांसारखे झाले आहेत. त्यात आपल्यापेक्षा भिन्न मतांना क्वचितच वाव दिला जातो. त्याऐवजी वेगवेगळ्या मतांच्या लोकांना एकत्र आणण्याचे संवादाचे मंच तयार व्हायला पाहिजेत, असे त्यांनी म्हटले होते. संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो ग्युटेरास यांनीही इंटरनेट आज ज्या दिशेने जात आहे, त्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.

या जागतिक तज्ञांची आणि नेत्यांची मते गांभीर्याने घेण्यात आली, तर इंटरनेटला पुन्हा एक वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. इंटरनेटची तिशी पूर्ण होत असताना त्याच्या पन्नाशीपर्यंत ते असेच राहील का, याबाबत म्हणूनच शंका वाटते.

Leave a Comment