पहा एका मेकअप आर्टिस्टचे असामान्य कौशल्य

makeup
ल्युका ल्युस नामक इटालियन मेकअप आर्टिस्टच्या बोटांमध्ये जादू आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्याने मेकअप केलेल्या मॉडेल्सला पाहताना हे एखादे पोट्रेट किंवा डिजिटल आर्ट असावे असा भास पाहणाऱ्याला हमखास होतोच, मात्र व्यवस्थित निरखून पाहिल्यानंतर ही कमाल ल्युकाच्या मेकअपच्या कौशल्याची असल्याचे कळल्यानंतर पाहणारा अचंबित होऊन जातो. ल्युकाने आपल्या मेकअपच्या कौशल्याचे नमुने दर्शविणारी अनेक छायाचित्रे सोशल मिडीयावर सातत्याने प्रसिद्ध केली असून त्याच्या या कौशल्याचे हजारो चाहते आहेत. ल्युकाचे सोशल मिडीयावर अडीच लाखांहूनही अधिक फोलोअर्स असून, त्याने प्रसिद्ध केलेल्या प्रत्येक छायाचित्राला मिळणारे ‘लाईक्स’ हजारोंच्या घरात असतात.
makeup1
ल्युका करीत असलेल्या मेकअपच्या पद्धतीला ‘ऑप्टिकल इल्युजन’ मेकअप म्हटले जात असून, या पद्धतीचा मेकअप करण्यास ल्युकाने २०१४ सालापासून सुरुवात केली. सर्वात आधी त्याने या पद्धतीच्या मेकअपचे प्रयोग आपल्या हातावर सुरु केले. मेकअपची ही पद्धत वापरताना ल्युका आपल्या हाताचा असा मेकअप करे, की त्याच्या हाताचे काही भाग नाहीसे झाल्याचा आभास होई. हे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ल्युकाने आपल्या चेहऱ्यावर मेकअप करण्यास सुरुवात केली. त्याचा मेकअप केलेला चेहरा पाहून या चेहऱ्याचे देखील काही भाग गायब असल्याचा भास पाहणाऱ्याला होत असे.
makeup2
पाहता पाहता ल्युकाचे हे मेकअपचे प्रयोग यशस्वी ठरले आणि अतिशय लोकप्रियही होऊ लागले. मेकअपसाठी प्रसाधने वापरताना स्वतःच्या ‘कॉन्टूअरिंग’ आणि ‘शेडींग’च्या कौशल्याच्या जोरावर एखाद्याचा चेहरा संपूर्णपणे बदलून टाकण्याचे कसब ल्युकाला अवगत झाले आहे. त्याच्या या कौशल्याच्या बळावरच ल्युकाने हजारो लोकांची मने जिंकली असून, त्याच्या बोटांमध्ये जादू असल्याचे त्याचे चाहते म्हणतात.