सूरतमध्ये अवघ्या चार तासांत ‘सर्जिकल स्ट्राईक’ साडी तयार

saree
पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे अनेक जवान शहीद झाल्यानंतर या हल्ल्याचे प्रत्युत्तर देत भारताने सीमेपार बालाकोट येथे असलेले अतिरेकी संघटनेचे ट्रेनिंग कॅम्प्स् नेस्तनाबूत करण्यासाठी हवाई हल्ले केले होते. या हवाईहल्ल्यांचे वृत्त समजताच संपूर्ण देशभरामध्ये आनंद व्यक्त केला गेला होता. नागरिकांनी सोशल मिडीयावर दिलेल्या असंख्य प्रतिक्रियांच्या मार्फतही या हवाईहल्ल्यांबाबत आनंद आणि समाधान व्यक्त केले होते. याच भावना व्यक्त करीत सूरत येथील साड्यांच्या व्यापाऱ्याने अवघ्या चार तासांच्या आत ‘सर्जिकल स्ट्राईक’ साडी तयार करविली असून ही साडी खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.

सूरत येथे कपड्याची मोठी बाजरपेठ असून, नवनवीन ट्रेंड्सच्या साड्या येथे नेहमीच पहावयास मिळत असतात. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक साडी बाजारमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असल्याचे वृत्त समजताच ही साडी खरेदी करण्यसाठी मोठी गर्दी झाली. इतकेच नव्हे, तर दोन हजार सर्जिकल स्ट्राईक साड्यांची आगाऊ मागणीही आली असल्याचे समजते. सहा मीटर लांबीच्या या पूर्ण साडीवर सर्जिकल स्ट्राईकची चित्रे आहेत. या चित्रांमध्ये पंतप्रधान मोदींपासून भारतीय सैन्याचे जवान, हवाई हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली मिराज २००० विमाने आणि इतर लढाऊ विमाने चितारण्यात आली आहेत. या साडीची सविस्तर माहिती देणारा व्हिडियो सोशल मिडीयावरही अपलोड करण्यात आला आहे.

Leave a Comment