महिलांच्या शरीरामध्ये होत असलेले हार्मोन्सचे असंतुलन कसे ओळखावे?

harmon
महिलांच्या शरीरातील हार्मोन्सच्या पातळ्यांमध्ये सातत्याने बदल घडून येत असतात. मासिक पाळी सुरु होताना, गर्भधारणा झाली असता, प्रसूती झाल्यानंतर आणि मासिक पाळी कायमस्वरूपी बंद होत असताना हे बदल सर्वाधिक घडून येत असतात. पण एरव्ही देखील शारीरिक, मानसिक तणाव, कोणत्याही प्रकारचे आजार या आणि अशा अनेक कारणांच्या मुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडत असते. त्यामुळे महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, अनेकदा आपल्याला होणारा त्रास हा हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे होत असावा, हे महिलांच्या लक्षात येत नाही. शरीरामधील हार्मोन्स असंतुलित असतील, तर याची काही लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे दिसून आल्यास त्यांकडे दुर्लक्ष न करता त्वरित तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
harmon1
महिला गर्भवती असताना किंवा प्रसूतीनंतर, व मेनोपॉझच्या काळादरम्यान तिच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होत असतात. त्यामुळे या काळामध्ये केस खूप जास्त गळू लागतात. अमेरिकन हेअर लॉस असोसिएशनच्या अनुसार महिलांच्या शरीरामध्ये माफक प्रमाणामध्ये असलेला टेस्टोस्टेरोन नामक हार्मोन ज्यावेळी डीएचटी हार्मोनचे कार्य प्रभावित करू लागतो, तेव्हा त्यापासून तयार होणारे एन्झाइम हेअर फॉलीकल्सना अपायकारक ठरते आणि त्यामुळे प्रमाणाबाहेर केसगळती सुरु होते. त्यामुळे केसगळती मोठ्या प्रमाणात होणे हे हार्मोन्सच्या असंतुलनाचे लक्षण असू शकते.
harmon2
रात्री झोपले असताना अचानक दरदरून घाम फुटणे याला ‘नाईट स्वेट’ म्हटले जाते. अशा प्रकारे रात्री घाम फुटणे हे हार्मोन्सच्या असंतुलनाचे सूचक असू शकते. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजन हार्मोनची पातळी घटते आणि शरीराचे ‘ओव्हरहिटिंग ‘ सुरु होते. त्यामुळेच रात्री झोपले असताना दरदरून घाम फुटण्यासारख्या समस्या उद्भवतात. त्याचबरोबर सतत शारीरक मरगळ किंवा थकवा जाणविणे हे देखील हार्मोन्सची पातळी असंतुलित असण्याचे लक्षण आहे. कोर्टीसोल हा स्ट्रेस हार्मोन असून हा अधिक सक्रीय होऊ लागला, तर याचा परिणाम सरळ सेरोटोनीनच्या पातळीवर होतो. सेरोटोनीन हा हार्मोन मनावरील तणाव कमी करणारा आहे. पण याच्या पातळीमध्ये घट होऊन कोर्टीसोलचे प्रमाण वाढल्याने सातत्याने तणाव, थकवा जाणवू लागतो. यामुळे क्वचित काही महिलांना मानसिक नैराश्याला देखील तोंड द्यावे लागते.
harmon3
शरीरामध्ये हार्मोन्सच्या पातळीमध्ये असंतुलन असले, तर त्यामुळे अचानक वजन खूप वाढू लागते, किंवा अचानक घटू लागते. थायरॉईड ग्रंथीचे कार्य बिघडले असण्याचे हे सूचक असू शकते. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तपासण्या करून घेऊन वेळीच औषधोपचार सुरु करणे इष्ट ठरते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment