जगामध्ये अनेक ठिकाणी झाली ‘अशा’ही वस्तूंची चोरी

theft
या जगामध्ये अनेक बहुमूल्य वस्तूंच्या चोऱ्या झाल्या आहेत. अनमोल रत्ने, प्राचीन मूर्ती, प्रसिद्ध चित्रकारांनी बनविलेली पेंटींग्ज, आणि मोठ्या रकमांच्या चोऱ्यांचे अनेक किस्से आजवर आपण ऐकले आहेत. या चोऱ्या ज्या पद्धतीने घडवून आणल्या गेल्या ती सर्व हकिकत एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी इतकी थरारक होती. मात्र काही लोकांनी घडवून आणलेल्या चोऱ्या इतक्या विचित्र होत्या, की अशा ही वस्तूंच्या चोऱ्या होऊ शकतात यावर विश्वास बसणे काहीसे कठीणच वाटते.
theft1
सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या आणि हिमनग वेगाने वितळत आहेत. त्यामुळे पेटागोनिया येथे असलेल्या हिमनद्या वाचविण्याचा प्रयत्न पर्यावरणवादी एकीकडे करीत असतानाच एका चिलीयन व्यापाऱ्याला मात्र चक्क एका मोठ्या हिमनदीतील बर्फाची चोरी करण्याची बुद्धी झाली. एक मोठा रेफ्रीजरेटेड ट्रक घेऊन हे महाशय हिमनदीजवळ पोहोचले आणि तब्बल ४५४ किलो बर्फाची चोरी जॉर्ज मॉन्ट नामक हिमनदीतून केली. या चोरीसाठी पकडले गेल्यानंतर हिमनदीमधून घेतलेल्या बर्फापासून ‘डिझायनर आईस क्युब्स’ बनवून विकण्याचा आपला विचार असल्याचे या व्यापाऱ्याने म्हटले.
theft2
२०११ साली अमेरिकेतील स्क्रॅप मेटल चोरांनी चक्क एक चाळीस टन वजनाच्या, पन्नास फुट लांबीच्या लोखंडाच्या पुलाची चोरी केली. या पुलाचे बीम्स वेगळे करण्याकरिता चोरांनी मोठमोठ्या ब्लो-टॉर्चेसचा वापर केला. चोरांनी या ब्रिजचे पुरते नुकसान केले असल्याने हा ब्रिज पुन्हा बनविण्यासाठी स्थानिक प्रशासनाला १००,००० डॉलर्स खर्च आला असून, चोरांना मात्र आपल्या कर्माची फळे भोगण्यासाठी गजाआड जावे लागले आहे. २०१२ साली चेकोस्लोव्हेकियामध्ये देखील चोरांच्या एका टोळीने दहा टन वजनाच्या पुलाची दिवसाढवळ्या चोरी केली. आपण सरकारी अभियंते असल्याचे भासवून पूल असलेल्या ठिकाणी सायकलिंग ट्रॅक बनविला जायचा असल्याने हा पूल काढून टाकायचा असल्याची बतावणी करून या चोरांच्या टोळीने सर्वांच्या समक्ष हा पूल काढून नेला होता.
theft3
गोड पदार्थ अतिशय आवडणाऱ्या एका चोराला टोकियो पोलिसांनी पकडले. याशुहीरो वाकाशिमा नामक या पठ्ठ्याने अनेक मिठायांच्या दुकानांमध्ये चोऱ्या करून आईसक्रीम, चॉकोलेट, पुडिंग्ज आणि इतर अनेक मिठाया फस्त केल्या. या चोराने खाऊन टाकलेल्या मिठायांची किंमत पन्नास हजार डॉलर्सच्या घरात होती. हा मिठाई चोर पकडला जाईपर्यंत त्याने तब्बल चाळीस चोऱ्या केल्या होत्या. याला पकडण्यासाठी पोलिसांना देखील पुष्कळ कष्ट घ्यावे लागले. अखेरीस त्याने ज्या दुकानामध्ये मिठाई खाऊन फस्त केली होती, तिथून त्याचा डीएनए मिळवून त्यावरून पोलिसांनी त्याला शोधून काढले.

Leave a Comment