चेन्नईच्या तेरा वर्षीय पियानोवादकाच्या कौशल्याने भारावले ‘द एलन शो’चे दर्शक

pion
केवळ तेरा वर्षांच्या कोवळ्या वयातच चेन्नईच्या लिडीयन नादस्वरम याने मोठा लौकिक संपादन केला आहे. पियानोवादनामध्ये अतिशय निपुण असलेल्या लिडियनने सुप्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान यांनाही प्रभावित केले असून, आता अमेरिकेमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या एलन डीजेनेरस हिच्या ‘द एलन शो’मध्ये सहभागी होऊन आपल्या कौशल्याने लिडियनने या शोच्या दर्शकांना मंत्रमुग्ध केले आहे. एलन डीजेनेरस हिने स्वतः लिडियनच्या पियानोवादनाचा व्हिडियो आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला असून, यामध्ये लिडियन स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधून आपल्या बोटांमधील जादू पियानोवरील सुरेल स्वरांच्या रूपात दर्शकांसमोर आणीत असल्याचे दिसत आहे. एलनने प्रसिद्ध केलेला लिडियनचा हा व्हिडियो व्हायरल झाला असून, आतापर्यंत या व्हिडियोला २.६ मिलियनच्या वर ‘व्ह्यू’ मिळाले असून पन्नास हजारांच्या वर प्रतिक्रिया या व्हिडियोवर आल्या आहेत.

एलनला मुलखत देत असताना आपण आपल्या दोन्ही हातांनी दोन वेगवेगळे पियानो वाजवू शकत असल्याचेही लिडियनने एलनला सांगितल्यावर एलनसमवेत उपस्थित प्रेक्षकांच्याही आश्चर्याला पारावर उरला नाही. त्यानंतर लिडियनने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून सुप्रसिद्ध संगीतकार मोझार्ट यांची ‘टर्किश मार्च’ नामक रचना प्रेक्षकांसमोर सादर केली. लिडियनचे पियानोवादनाचे कौशल्य पाहून तिथे उपस्थित असणारे सर्वच दर्शक आणि खुद्द एलन देखील अतिशय प्रभावित झाले. लिडियनचे वादन संपल्यानंतर समस्त दर्शकांनी उभे राहून टाळ्यांच्या गडगडाटासह आपल्या कौतुकाची पावती लिडियनला दिली.

लिडियनचा संगीत प्रवास तो अवघा दोन वर्षांचा असताना सुरु झाला. आता वयाच्या तेराव्या वर्षी लिडियन पियानोसोबत मृदंगम, गिटार आणि तबलावादनामध्येही निपुण आहे.

Leave a Comment