भाजप आणि काँग्रेसचे ‘गोतास काळ’

combo
माणसाचा सर्वात उत्तम मित्र म्हणजे त्याची जीभ आणि सर्वात वाईट म्हणजेही त्याची जीभच, अशी एक म्हण आहे. सध्या या म्हणीचा प्रत्यय देशातील दोन प्रमुख राजकीय पक्षांना येत आहे. एक एका राज्याचा माजी मुख्यमंत्री, तर दुसरा अन्य राज्यातील विद्यमान मंत्री. दोघांचीही जीभ सैल सुटली आणि स्वपक्षीयांनाच ते नकोसे झाले. थोडक्यात ते गोतास काळ ठरले आहेत. ते दोन नेते म्हणजे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि पंजाबचे विद्यमान मंत्री नवज्योतसिंग सिद्धू.

पाकिस्तानवर भारताने केलेल्या हल्ल्यामुळ कर्नाटकात भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढतील, असे म्हणून येडियुरप्पांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना अडचणीत आणले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यापासून अंतर राखणेच पसंत केले आहे. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे कौतुक करून सिद्धू यांनीही आफत ओढवून घेतली. त्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसजन नाराज आहेत.

पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या संदर्भात कोणीही राजकारण करू नये, असा आग्रह भारतीय जनता पक्षाने धरला आहे. मात्र त्यांच्याच नेत्याने या आग्रहाला हरताळ फासला. काही दिवसांपूर्वी एका नेत्याने म्हटले होते, की वातावरण तयार झाले आहे आणि आता त्याला मतात बदलायचे आहे. त्यावर टीका होत असतानाच कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष बी. एस येडियुरप्पा हे पुढे आले. भारत आणि पाकिस्तानातील सध्याचे वातावरण आणि लष्कराच्या कारवाईमुळे भाजप कर्नाटकात लोकसभेच्या 22 जागा जिंकेल, असे ते म्हणाले. येडियुरप्पा यांचे हे वक्तव्य भाजपला ओशाळवाणे करायला पुरेसे होते.

दुसरीकडे आहेत सिद्धू. भारत आणि पाकिस्तानातील वाढता तणाव आणि भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कोणताही राजकीय कार्यक्रम करायचा नाही, असे काँग्रेसने निश्चित केले आहे. इतकेच नव्हे तर या मुद्द्यावर राजकीय वक्तव्ये करू नयेत, असेही पक्ष कार्यकर्त्यांना सांगितल्याचे समजते. त्यामुळेच गुरुवारी अहमदाबाद येथे होणारी काँग्रेस कार्यसमितीची बैठकही पक्षाने स्थगित केली. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर आपण सरकार आणि लष्करासोबत असल्याचेही काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

परंतु नवज्योतसिंग सिद्धू यांना हे पसंत नाही, असे दिसते. क्रिकेट खेळाडू म्हणून इम्रान खान सोबत असलेल्या आपल्या मैत्रीचेच तुणतुणे ते अजून वाजवत आहेत. त्यासाठी पाकिस्तानची बाजू घेतानाही त्यांना काही वावगे वाटत नाही. पुलवामात केंद्रीय राखीव पोलिस दलावर झालेल्या हल्ल्यानंतरही त्यांनी आपला हट्ट सोडला नाही. हा हल्ला म्हणजे काही भटकलेल्या व्यक्तींचे कृत्य असल्याचे सांगून त्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरता येणार नाही, असे ते म्हणाले होते. काँग्रेसने त्यांच्या या वक्तव्याला जराही थारा दिला नाही, पण तरीही ते गप्प बसायचे नाव घेत नाहीत. आता पाकिस्तानशी चर्चा करण्याची ते वकालत करत आहेत. अर्थातच काँग्रेसने त्यांचे हे वक्तव्यही उडवून लावले आहे.

खरे तर ही वेळ अटीतटीची, आणीबाणीची. पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात भारताच्या 40 जवानांना हकनाक आपल्या प्राणांना मुकावे लागले. देशाच्या कोनाकोपऱ्यातून दहशतवाद आणि पाकविरोधी आवाज बुलंद झाला! सहानुभूती आणि संतापाची एक लाट उसळली. सर्वसामान्यांचे रक्त खवळून उठले. कधी नव्हे ती भारताची विमाने शत्रूची हद्द ओलांडून बॉम्बफेक करून आली. संपूर्ण जगाचा आपल्याला पाठिंबा मिळाला. आपल्या शूर जवानांनी प्राणांची तमा न बाळगता सीमेचे, पर्यायाने देशाचे, रक्षण केले. अभिनंदन वर्धमानसारखा बहाद्दर प्रत्यक्ष मृत्यूला मात देऊन परत आला.

अन आपले नेते ही अशी बाष्कळ वक्तव्ये करून शत्रूच्या हातात कोलित देत आहेत. घरापासून हजारो मैल दूर असलेल्या शूर जवानांना मानसिक स्थैर्य देण्याची जबाबदारी सरकारची आणि समाजाची आहे. हे स्थैर्य देणे तर दूरच, उलट आगीत तेल ओतण्याचे काम ही मंडळी करत आहेत. या तोंडाळांना आवरणार कोण, असा प्रश्न आता सर्वांच्या मनात येत आहे. एकवेळ दहशतवाद्यांचे हल्ले परवडले कारण त्यांचा शस्त्राने सामना करता येतो, मात्र स्वकीयांची अशी बाष्कळ वक्तव्ये नको, असे त्या जवानांच्या मनाला वाटले तर त्यात काय अस्वाभाविक.

त्यामुळे काँग्रेस आणि भाजपच्या धुरिणांनी त्यांच्या पक्षातील सध्याचे सिद्धू आणि येडियुरप्पा, तसेच अन्य असे कोणी होतकरू सिद्धू किंवा येडियुरप्पा, यांना आवर घालावा, हीच देशवासियांची या घडीला मागणी आहे.

Leave a Comment