उत्तम आरोग्यासाठी आजमावा हे घरगुती उपाय

ramdev-baba
आपल्या दैनंदिन आहारामध्ये वापरले जाणारे अनेकविध मसाल्यांचे पदार्थ, किंवा सामान्यपणे घरामध्ये सापडणारे अनेक अन्नपदार्थ आरोग्याशी निगडित अनेक प्रकारच्या तक्रारी दूर करण्यास सक्षम आहेत. त्याचप्रमाणे तुळस किंवा कोरफडीसारख्या वनस्पती देखील गुणकारी आहेत. याच वनस्पती आणि काही अन्नपदार्थांचा वापर करून अनेक तऱ्हेचे विकार दूर करण्यासाठी काही घरगुती अपाय योगगुरु रामदेव बाबांनी सांगितले आहेत.
गिलोय ही वनस्पती डेंग्यू आणि मलेरिया सारख्या रोगांमुळे शरीरामध्ये होणारी प्लेटलेट्सची कमतरता भरून काढणारी आहे. त्याचप्रमाणे जुनी सांधेदुखी, किंवा शारीरिक वेदना कमी करण्यासही गिलोय सहायक आहे. गिलोयच्या रसाच्या सेवनाने सर्दी, कफ, ताप यांसारखे विकार आणि इतर संसर्ग दूर होतात. याच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्तीही वाढते. गिलोय वजन आणि ब्लड शुगरची पातळी नियंत्रणामध्ये ठेवण्यासही सहायक आहे.
ramdev-baba1
आवळ्याचा रस आणि कोरफडीचा रस समप्रमाणात एकत्र करून त्यामध्ये गरम पाणी मिसळावे आणि या मिश्र रसाचे ददररोज सकाळी सेवन करावे. यामुळे बद्धकोष्ठाची समस्या दूर होऊन पोट साफ होते. हा रस डोळे, केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी देखील उत्तम असून, याच्या नियमित सेवनाने शरीरामध्ये उत्साह आणि स्फूर्ती राहते. पित्तामुळे अनेकदा डोकेदुखी उद्भवते, अशा वेळी साजूक तुपामध्ये बनविलेली जिलेबी एक ग्लास गरम दुधाच्या सोबत सेवन करावी, याने पित्त शमते आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो. त्याचप्रमाणे एक ग्लास गाईच्या दुधासोबत एक चमचा बदाम रोगन घेतल्याने मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी कमी होते.
ramdev-baba2
शिशम, तुळस आणि कडूलिंबाची पाने सकाळी रिकाम्या पोटी चावून खाल्ल्याने मधुमेह नियंत्रित राहत असून, बद्धकोष्ठाची समस्या दूर होते. त्याचबरोबर या पानांच्या नियमित सेवनाने रक्तशुद्धी होते. कडूलिंबाची पाने त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून, अंगाला सतत खाज सुटत असल्यास किंवा घामोळी आली असल्यास कडूलिंबाची काही पाने पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी आंघोळीसाठी वापरायच्या पाण्यामध्ये मिसळून त्याने स्नान केल्याने त्वचेला सुटणारी खाज आणि घामोळी कमी होतात.
ramdev-baba3
कोरफडीच्या रसाच्या नियमित सेवनाने पित्त शमते. तसेच महिलांच्या बाबतीत ‘मेनोपॉझ’, म्हणजेच मासिक पाळी कायमस्वरूपी बंद होत असताना उद्भविणाऱ्या अनेक तक्रारींवरही कोरफडीचा रस उपयुक्त आहे. त्याचबरोबर वातामुळे उद्भविणाऱ्या समस्या नाहीशा करण्यासाठी हळद, मेथी दाण्याची पूड आणि सुंठ यांचे सेवन उपयुक्त आहे. हे मिश्रण सांधेदुखीमुळे उद्भविणाऱ्या वेदना कमी करण्यासही सहायक आहे. हे मिश्रण उष्ण पडू नये या साठी यामध्ये कोरफडीचा रस समाविष्ट करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment