अभिनंदन, कॅप्टन! तुमचा अभिमान वाटतो!

abhinandan-vardhman
राजकारणी म्हणजे एकजात बदमाश, ठक आणि स्वार्थी असा आपल्याकडे सर्वसामान्य समज आहे. मात्र या या समजाला तडे देणारे एखादे व्यक्तिमत्त्व मधूनच समोर येते आणि तोंडातून आपोआप शाबासकीची दाद निघून जाते.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंद सिंह यांनी हा मान परत मिळविला आहे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जात निव्वळ देशभक्तीचा विचार करणारे नेते म्हणून अमरिंदर सिंह यांनी स्वतःला चांगलेच प्रस्थापित केले आहे. स्वतः भारत-पाकिस्तान युद्धात भाग घेतलेल्या अमरिंदर सिंह यांनी आपल्यातील भारतीय जवान आजही जीवंत असल्याचे दाखवून दिले आहे. त्यासाठी निमित्त ठरले ते देशाचा खराखुरा नायक ठरलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान.

भारताचे लढवय्ये पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या तावडीतून शुक्रवारी मायदेशी परत आले. त्यांची बिनशर्त सुटका करण्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक संसदेत काल, गुरुवारी, केली होती. अभिनंदन यांच्या स्वागतासाठी संपूर्ण देशातील जनसागर वाघा सीमेवर एकवटला होता. या देशभक्तांमध्ये आपणही सहभागी होऊ इच्छितो, हे सांगून कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी समस्त देशवासियांची मने जिंकली. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी विंग कमांडर अभिनंदनच्‍या सुटकेचे स्‍वागत तर केलेच, मात्र अभिनंदन यांना घ्यायला स्वतः जाऊ इच्छित असल्याचे जाहीर केले.

“प्रिय मोदीजी, सध्या मी पंजाबच्या विविध भागांचा दौरा करत आहे व आता मी अमृतसरमध्ये आहे. विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तान वाघा सीमेवरून भारतात पाठवणार आहेत अशी माहिती मला कळाली आहे. मी त्यांना घ्यायला जाऊ इच्छितो. हा माझ्यासाठी सन्मानच ठरेल कारण अभिनंदन आणि त्यांचे वडील एनडीएचे विद्यार्थी आहेत आणि मीदेखील एनडीएचा विद्यार्थी आहे. त्यामुळे अभिनंदन यांना घ्यायला जाणे हा माझ्यासाठी सन्मान ठरेल,” असे अमरिंदर सिंग ट्विटमध्‍ये म्हणाले.

एखादा उमदा सेनानीच असा उदात्त विचार मांडू शकतो. अर्थात परकीय देशाच्या कैदेतून सुटलेल्या जवानांना आणण्याची ठरलेली प्रक्रिया असते. त्यानुसार अभिनंदन यांची सीमेवर वैद्यकीय तपासणी इत्यादी सोपस्कार झाले. पण म्हणून अमरिंदर यांची उदार भूमिका कमी ठरत नाही. भारत-पाकिस्तानचे सैनिक एकीकडे रणांगणावर एकमेकांना भिडण्याची तयारी करत आहेत, दुसरीकडे आपल्याकडे या लढाईचे राजकीय फायदे कोणाला कसे मिळणार, याचे आडाखे मांडले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर खासकरून अमरिंदर यांची ही उदात्तता कोणाला भावणार नाही? यापूर्वीही अमरिंदर सिंग यांनी अशीच ठामेठोक भूमिका निरनिराळ्या विषयांवर घेतली आहे.

जी व्यक्ती खलिस्तानची समर्थक आहे, ती कितीही मोठी असली तरी त्या व्यक्तीला भेटणार नाही, हे त्यांनी यापूर्वी सांगितले होते. एवढेच नव्हे तर आपल्या त्या वक्तव्यावर ते ठामही राहिले होते. म्हणूनच कॅनडाचे संरक्षण मंत्री हरजीतसिंह सज्जन भारत दौऱ्यावर आलेले असताना ते त्यांच्या दौऱ्यात सामील झालेले नव्हते. हरजीतसिंह आणि त्यांचे वडील हे खलिस्तानचे समर्थक होते व आहेत, त्यामुळे त्यांना भेटण्याचा प्रश्नच येत नाही, असे सिंह यांनी सांगितले होते.

त्याच प्रमाणे कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटनप्रसंगी नवज्योत सिंह सिद्धू यांनी पाकिस्तानला जाऊ नये, असेही त्यांनी बजावले होते. “या प्रश्नी माझ्या तीव्र भावना आहेत. माझे लष्कराशी दाट संबंध आहेत आणि माझ्या लोकांना ठार मारताना मी पाहत राहू शकत नाही. पाकिस्तानच्या हातून दररोज निष्पाप भारतीय नागरिक आणि सैनिक ठार मारले जात असताना मी कसा काय या कार्यक्रमाला जाऊ,” असा प्रश्नही त्यांनी केला होता.

अमरिंदरसिंह हे लष्करातील माजी कॅप्टन. पंजाबमध्ये 1980च्या दशकात धुमाकूळ घालणाऱ्या दहशतवादाला संपुष्टात आणण्याचे श्रेय बियांतसिंह या काँग्रेसी मुख्यमंत्र्यांना जाते. त्यासाठी त्यांची अतिरेक्यांनी हत्या केली. अमरिंदरसिंह हे त्याच परंपरेतील नेते आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते भारतीय लष्करात होते. कॅप्टन अमरिंदर 1963 मध्ये लष्करात भरती झाले आणि 1965 च्या सुरूवातीस त्यांनी राजीनामा दिला होता. मात्र पाकिस्‍तानशी युद्ध होणार म्हटल्यावर 1966 च्या सुरूवातीस त्यांनी पुन्हा गणवेश अंगावर चढविला. तो गणवेश त्यांनी युद्ध संपल्यावर परत उतरवला.

कॅप्टन अमरिंदर यांनी गणवेश उतरवला असला, तरी अभिनिवेश अद्याप तोच आहे, हे त्यांनी वारंवार दाखवून दिले आहे. त्यामुळेच आज मुख्यमंत्री असतानाही कॅप्टन अमरिंदर यांनी सूर न बदलता आपण पूर्वी होतो तसेच आहोत, हे दाखवून दिले आहे. त्यामुळेच विंग कमांडर अभिनंदन यांच्या सोबतच कॅप्टन अमरिंदर यांचेही अभिनंदन करण्याची ही वेळ आहे.

Leave a Comment