विच-हंट – स्मारक एका अमानुष प्रथेचे

memorial
फार नाही, अगदी काही शतकांपूर्वी युरोपमध्ये जादूटोणा आणि काळ्या जादूची लोकांना भीती वाटत असे. याच भीतीतून उद्भवली एक मोहीम – तिला नाव होते विच-हंट. कित्येक शतके चालू असलेली ही मोहीम एका अमानुष प्रथेतच रूपांतरीत झाली. या मोहिमेला शेकडो जण बळी पडले. फ्रान्स, जर्मनी, उत्तर इटाली, स्वित्झर्लंड, बेल्जियम, लक्झमबर्ग आणि नेदरलँड अशा देशांमध्ये बहुतांशी या घटना घडल्या मात्र इंग्लंडसारख्या देशांतही अशा घटनांच्या नोंदी आहेत. युरोप आणि युरोपीय देशांच्या वसाहतीतील हजारो लोकांचा यात मृत्यू झाला आणि इतर लाखों लोकांना अटक, चौकशी, द्वेष इत्यादींचा सामना करावा लागला.

या विच-हंटिंगचे मूळ होते रोमन कॅथोलिक चर्चच्या इन्क्विझिशन या मोहिमेत. नास्तिक लोकांना धर्मांतरित करणे आणि आस्तिकांना धर्मातून बाहेर पडण्यापासून परावृत करणे, हे या मोहिमेचे मूळ होते. इन्क्विझिशन हे चर्चच्या पोलीस दलासारखे काम करत असे. पोप इनोसेन्ट आठवे यांनी 5 डिसेंबर 1484 रोजी एक आदेश जारी करून भानामतीला (विचक्राफ्ट) प्रतिबंध केला. तसेच त्यांनी जॅकब स्पेंगर आणि हेनरिक क्रॅमर या दोघांना चेटकीणींचा शोध घेण्याचे अधिकार दिले.

या दोघांनी मॅल्लेअस मॅलेफॅरम (चेटकीणींचा हातोडा) नावाचे एक पुस्तक लिहिले. कॅथलिक आणि प्रोटेस्टंट दोन्ही पंथांनी या पुस्तकाला मान्यता दिली होती. चेटकीणींना कसे ओळखायचे आणि त्यांचा नाश कसा करायचा, याचे वर्णन या पुस्तकात केले होते. जगातील सर्वाधिक विषारी आणि नुकसानकारक पुस्तकांमध्ये या पुस्तकाची गणना होते.

पोप इनोसेन्ट आठवे यांनी जारी केलेल्या आदेशानुसार आणि या पुस्तकातील माहितीवरून संपूर्ण युरोपमध्ये चेटकीणींची शोधमोहीम सुरू झाली. त्यावेळी नव्यानेच आलेल्या छपाईच्या तंत्रज्ञानाने तर त्यात भरच घातली. त्यामुळे ही मोहीम अगदी अमेरिकेपर्यंत पोचली.

या मोहिमेत बळी पडलेल्यांपैकी 70 टक्के आरोपी महिला, खासकरून विधवा महिला, होत्या. त्यांचा बचाव करण्यासाठी कोणीही नसायचे. या जादूटोण्याच्या आरोपांना कोणत्याही पुराव्याची गरज नसायची. तथाकथित चेटकीणींवर खटले चालायचे ते केवळ त्यांच्याकडून कबुलीजबाब घेण्यासाठीच! तसेच कोणत्याही गोष्टीसाठी त्यांना जबाबदार धरले जायचे. पिकांवर गारपीट झाली, गाईला दूध येईनासे झाले किंवा एखादा माणूस नपुंसक असणे किंवा स्त्री निपुत्रीक असणे अशा क्षुल्लक गोष्टींसाठीही त्यांना दोषी धरले जायचे.

जादूटोणा करत असल्याचा संशय़ असलेल्या व्यक्तीला थंड पाण्याच्या हौदात बुडविले जायचे. ती व्यक्ती बुडाली तर तिला निर्दोष मानले जायचे आणि तरंगली तर मात्र दोषी धरले जायचे. कारण चेटकीणींना वजन नसते, असे त्यांवेळी मानले जायचे. त्यांना तिथल्या तिथे जाळले जायचे किंवा खटल्यासाठी अधिकाऱ्यांकडे सोपविले जायचे.

साधारणतः इ. स. 1450 ते 1750 हा विच-हंटचा काळ मानला जातो. या दरम्यान अंदाजे 35,000 ते 100,000 व्यक्तींची हत्या करण्यात आली, असा अंदाज आहे. मात्र आफ्रिका आणि आशियासारख्या काही देशांमध्ये ही प्रथा नंतरही सुरू होती. सौदी अरेबिया आणि कॅमेरून या देशांमध्ये आजही विच-हंटविरोधी कायदे आहेत. ही प्रथा एवढी भयानक होती, की आजही इंग्रजी भाषेत एखाद्याच्या मागे विनाकारण चौकशीचा फेरा लावणे या अर्थाने विच-हंट हा अर्थ वापरण्यात येतो.

आपल्याकडेही परिस्थिती फारशी वेगळी नाही. युरोपएवढी क्रूर नव्हे, परंतु चेटकीणीच्या नावाखाली महिलांचा छळ करण्याची प्रथा आपल्याकडेही मोठ्या प्रमाणात आहे. झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, आसाम यांसारख्या काही राज्यांमध्ये आजही ही अमानुष प्रथा प्रचलित आहे. ओडिशाने तर 2013 मध्ये या प्रथेच्या विरोधात एक कायदा केला आहे. या प्रथेविरोधात जनजागृती करण्याचेही प्रयत्न सुरू असून हे स्मारक त्याचाच भाग आहे! भारतात 134 लोक (प्रामुख्याने महिला, परंतु काही पुरुषही) जादूटोणा केल्याच्या आरोपावरून मारले गेले आहेत. एकट्या ओडिशामध्ये गेल्या वर्षी एकूण 18 जणांचा जमावाकडून मृत्यू झाला होता, तर केओनझार जिल्ह्यात गेल्या 10 वर्षात 50 हून अधिक जण ठार झाले आहेत.

हा सर्व इतिहास सांगायचे कारण काय? तर जगभरातील विच-हंटच्या बळींचे स्मारक आपल्या भारतात सुरू झाले आहे. ओडिशातील आदिवासींची बहुसंख्या असलेल्या केओंझार जिल्ह्यात गुरुवारी या स्मारकाचे उद्घाटन झाले. राज्याचे पोलिस महासंचालक राजेंद्रप्रसाद शर्मा यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले. अशा प्रकारेच हे पहिलेच स्मारक असल्याचे मानले जाते. या स्मारकाच्या मध्यभागी एका स्त्रीची प्रतिकात्मक प्रतिमा असून तिच्या अवतीभवती ग्रॅनाइट दगडांवर अंकित केलेली विच-हंटच्या सर्व ज्ञात बळींची नावे आहेत. या निमित्ताने या सर्व काळ्याकुट्ट इतिहासाची उजळणी होणार आहे. त्यातून लोक शहाणी झाली तर खरे!

Leave a Comment