मिग 21 – एका थकलेल्या क्रांतिकारक विमानाची कथा

mig
भारतीय हवाई दलाचे शूर वैमानिक विंग कमांडर अभिनंदन यांच्या अटकेमुळे मिग 21 हे विमान चर्चेत आले आहे. भारताच्या हद्दीत घुसखोरी केलेल्या पाकिस्तानच्या एफ 16 विमानांचा पाठलाग करताना अभिनंदन चालवत असलेल्या मिग 21 मध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यांनी या विमानातून पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारली परंतु ते पाकिस्तानच्या हद्दीत पोचले आणि त्यांना अटक करण्यात आली. यामुळे मिग 21 हे विमान जुने झाले असल्याची आणि त्याला हवाई दलातून कायमची रजा देण्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे.

पन्नास वर्षांपेक्षाही आधी भारतीय हवाई दलात समावेश झालेले मिग 21 हे विमान क्रांतिकारक समजले जाते. भारतीय हवाई दलात (आयएएफ) हे रशियन बनावटीचे विमान सर्वप्रथम 1963 मध्ये मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यावेळी रशिया हा सोव्हिएत संघाचा भाग होता आणि सोव्हिएत संघामध्ये नव्या विमानांना त्यांच्या रचनाकारांचे नाव देण्याची प्रथा होती. त्यानुसार या नव्या विमानाला मिकोयान गुरेविच (मिग -21) असे नाव देण्यात आले. यानंतर या विमानाच्या मिग 2३ आणि मिग 29 अशा आवृत्त्याही निघाल्या.

ज्या विमानातून विंग कमांडर अभिनंदन बाहेर पडले, ते विमान मिग -21 बायसन प्रकारचे आहे. मूळ विमानात केलेल्या सुधारणांनंतर हे नाव देण्यात आले आहे. आजही एफ६ सारख्या विमानांना टक्कर देण्याची क्षमता या विमानात आहे, यावरून त्याची भक्कम बांधणी लक्षात येऊ शकते. नवख्या किंवा किमान प्रशिक्षण असलेल्या वैमानिकालाही हे विमान सहजतेने हाताळता येते. त्यामुळे ते जगभरात लोकप्रिय असून ते जगात सर्वाधिक प्रमाणात निर्मिती झालेले विमान आहे. भारतात इ.स. 1966 मध्ये नाशिकजवळ असलेल्या हिंदुस्थान एरॉनॉटिक्स कंपनीच्या कारखान्यात या विमानांच्या उत्पादनास सुरुवात झाली. भारतीय हवाई दलासाठी आणि एक प्रकारे खुद्द भारतासाठीही हे विमान क्रांतिकारक ठरले. एक तर ते हवाई दलाने विकत घेतलेले ते पहिले गैर-पाश्चिमात्य लढाऊ विमान होते. तसेच स्वातंत्र्यानंतर गैर-पाश्चिमात्य देशांकडून घेतलेली ती पहिली शस्त्र प्रणाली होती.

सोव्हिएत संघाचे विमानांची रचना करण्याचे स्वतःचे तत्त्वज्ञान होते आणि लढाईचा पूर्णपणे वेगळा असा सिद्धांत होता. त्यामुळे विमानाची देखभाल आणि परिचालनाच्या त्यांच्या पद्धती पूर्णपणे वेगळ्या होत्या. हवाई दलाने या विमानांचे तंत्रज्ञान मिळविले मात्र त्यांची प्रक्रिया आणि पद्धत न वापरण्याचा जाणिवपूर्वक निर्णय घेतला.

आणखी एक विशेष बाब म्हणजे आपल्या हवाई दलाने मिग -21 आणि नंतर सुखोई 7 या सोव्हिएत विमानांचा अगदी अनोखा वापर केला. म्हणजे त्यांच्या मूळ निर्मात्यांना अभिप्रेत नव्हता असा वापर. सोव्हिएत अभियंत्यांनी संपूर्ण आशिया खंडात लढाई लढण्याच्या उद्देशाने ही विमाने तयार केली होती. मोठ्या संख्येने ही विमाने मध्य युरोपातील विविध तळांवर उभी असणार होती. त्याद्वारे एक किंवा दोन आठवड्यांचे तीव्र युद्ध लढले जाईल, अशी ती योजना होती. दीर्घकाळपर्यंत त्यांचा वापर करावा, ही त्यांची कल्पनाच नव्हती. भारताने ज्या प्रकारे कित्येक दशके या विमानांचा वापर केला, ते मिग 21 च्या रचनाकारांच्या स्वप्नातही नसेल. या 1950 च्या दशकात तयार केलेल्या छोट्याशा विमानाचे हे दीर्घायुष्य पाहून ते हतबुद्ध झाले असते. लष्करी वैमानिक म्हणून अर्हता प्राप्त होणार्या पहिल्या तीन भारतीय महिलांसह भारतीय वैमानिकांची नवी पिढी आजही मिग 21 वापरत आहे.

एके काळी भारतीय आकाशावर या विमानांचे अधिराज्य होते आणि 1980-90च्या दशकात हवाई दलाच्या लढाऊ विमानांमध्ये सुमारे 60 टक्के विमाने मिग 21 होती. आजही हवाई दलातील सुमारे 90 टक्के वैमानिकांनी मिग 21 विमानांच्या कोणत्या ना कोणत्या प्रकारात उड्डाण केले आहे.

अलीकडच्या काळात मिग विमानांची चर्चा झाली ती विमाने कोसळून वैमानिकांच्या मृत्यूंच्या संदर्भात. या दुर्घटना टाळण्यासाठी हवाई दलाने मिग 21च्या काही आवृत्त्या टप्प्याटप्प्याने थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मिग 21च्या काही प्रकारांना यापूर्वीच रजा देण्यात आली आहे. उदा. मिग 21 एफएल विमानांचे उड्डाण 2011 मध्ये थांबविण्यात आले.

या विमानांचे खरे कर्तृत्व दिसून आले होते ते 1971च्या युद्धात. हवाई दलाच्या याच विमानांनी तेव्हा ढाक्यातील गर्वनर्स हाऊसवर केलेला हल्ला निर्णायक ठरला होता. त्यामुळेच पश्चिम पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली होती. कारगिल संघर्षातही हे विमान तैनात करण्यात आले होते.

आज हवाई दलाच्या मिग 21 ताफ्यात टाइप 96, टाइप 77आणि बायसन प्रकारची विमाने आहेत. बायसन या प्रकारची विमाने 2017 नंतर हवाई दलातून काढण्याची योजना होती. मात्र एम-एमआरसीए आणि देशांतर्गत उत्पादन केलेल्या तेजस या लढाऊ विमानाच्या निर्मितीवर ते अवलंबून होते. ती योजना काही पूर्णत्वास गेली नाही आणि त्याची परिणती आपण विंग कमांडर अभिनंदन यांच्या अटकेत झालेली पाहत आहोत. या निमित्ताने तरी या थकलेल्या विमानाला निवृत्त करण्याचा गांभीर्याने विचार व्हावा.

Leave a Comment