माध्यमांनो, खरे देशद्रोही तुम्ही ठरलात..!

fake
अखेर पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्याची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारताने आणलेल्या दबावाच्या परिणामी हेी सुवार्ता कानी पडली. जिनेव्हा कराराचे बंधन आणि भारताच्या दबावामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना संसदेत अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा करावी लागली. संपूर्ण देशभरात या घोषणेमुळे आनंदाची लाट उसळली, एक प्रकारचा दिलासा पसरला. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. युद्धाच्या भूमीवर जिंकणारा परंतु तहाच्या टेबलवर हरणारा देश अशी भारताची ख्याती पसरली होती. त्याच भारताच्या दृष्टीने हा एक मोठा विजय म्हणावा लागेल.

पाकिस्तानला अन्य काही पर्यायच राहिला नव्हता, त्यामुळे शांततेसाठीचे एक पाऊल म्हणून विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्यात येणार असल्याचे इम्रान यांनी सांगितले. अभिनंदन यांच्या अटकेबाबत भारताने खंबीर भूमिका घेतली होती. त्यांची त्वरित आणि सुरक्षित सुटका करावी, ही मागणी भारताने लावून धरली होती. त्यांचा वापर करून भारताला ब्लॅकमेल करावे, ही पाकिस्तानची योजना होती मात्र त्यांच्या सुटकेसाठी कोणताही सौदा करण्यास भारताने स्पष्ट नकार दिला होता. इतकेच नव्हे तर या मुद्द्यावर पाकिस्तानशी वाटाघाटी करणार नाही आणि त्यांना कोणतीही इजा होता कामा नये, असेही भारताने स्पष्ट केले होते.

अंत भला तो सब भला या न्यायाने या घोषणेचे स्वागत होत असले तरी बुधवारपासून देशातील माध्यमांचे वर्तन अजिबात स्वागतार्ह नव्हते. एक तर पाकिस्तानने अभिनंदन यांचा जो व्हिडिओ प्रसृत केला होता, तो जिनेव्हा करार आणि आंतरराष्ट्रीय मानवीय कायद्य़ाच्या विरोधात होता. त्याचे अत्यंत बीभत्स दर्शन पाकिस्तानने घडविले. त्यातून आपण भारतावर कुरघोडी केल्याचे त्याला आपल्या देशवासियांना दाखवायचे होते, तसेच भारतीय लोकांवरही मानसिक वर्चस्व मिळवायचे होते.

या व्हिडिओचे प्रदर्शन करण्याचे आपल्या वाहिन्यांना काही काम नव्हते. मात्र त्यांनी ते करून मानसशास्त्रीय युद्धात वर्चस्व मिळविण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना हातभारच लावला. आपण पाकिस्तानच्या हातचे खेळणे ठरत आहोत, हेही त्यांना कळत नव्हते. आपल्या शत्रू राष्ट्राला मदत करणे, तेही युद्धासारखी परिस्थिती असताना यापेक्षा देशद्रोह आणखी वेगळा काय असतो? त्या अर्थाने माध्यमेच खऱ्या अर्थाने देशद्रोही ठरली.

हा व्हिडिओ दाखवू किंवा पुढे पाठवू नका, असे आवाहन आपल्या लष्कराने केले होते. सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी तरीही तो शेअर केला. त्यामागे त्यांची देशभक्तीचीच भावना होती, हे मान्य करावे लागेल. आपल्या शूर जवानाबाबत वाटत असलेल्या तळमळीतूनच आणि त्याच्याबाबत वाटत असलेल्या अभिमानातूनच ते हे करत होते. मात्र त्यांच्यात आणि टीव्ही वाहिन्यांमध्ये इतका तर फरक असायलाच हवा, की जबाबदारीने वागण्याचे भान किमान वाहिन्यांना तरी असायला हवे.

इतक्यावर थांबले असते तरी बरे होते. मात्र त्यापेक्षाही त्यांनी अक्षम्य गुन्हा केला तो अभिनंदन यांच्या घराचे, नातेवाईकांचे तपशील पुरवून. पाकिस्तानने प्रसृत केलेल्या चित्रफितीत पाकिस्तानी अधिकारी अभिनंदन यांना माहिती विचारताना दिसले. त्यावेळी आपले नाव, पद आणि सेवा क्रमांक या पलीकडे कोणतीही माहिती देण्यास नकार देताना ते दिसले. शक्य असूनही अभिनंदन यांनी ही माहिती स्वतःकडे ठेवली. वाहिनी आणि काही माध्यमांनी मात्र ही माहिती चव्हाट्यावर आणण्याचे जणू व्रतच घेतले होते. ‘दि हिंदू’सारखे प्रतिष्ठित वृत्तपत्रही यात मागे नव्हते. अभिनंदन यांचे घर, त्यांचे वडील आणि त्यांची पत्नी दाखवण्याची अहमहमिका वाहिन्यांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये लागली होती. आपण काय करतो आहोत आणि काय नाही, याची जणू त्यांना जाणीवच राहिली नव्हती.

पाकिस्तानचे पंतप्रधान प्रधानमंत्री इम्रान खान यांनी अभिनंदन यांना सोडण्याची घोषणा केल्यावरही हाच उन्माद दिसून आला. पाकिस्तान दबावाखाली झुकला, हे सांगण्याची चढाओढ लागली. त्यामुळे बिथरून अखेर पाकिस्तान आपला निर्णयच फिरवतो की काय, अशी शंका निर्माण व्हावी.
म्हणूनच आनंद महिंद्रा यांना ट्वीट करून संयमाचा सल्ला द्यावा लागला. ”वायुसेनेचा बहादूर अद्याप भारतात सुरक्षित पोचलेला नाही आणि आपल्या वीर सैनिकाला सकुशल देशात पोचू देणे, हे सर्वांचे लक्ष्य असले पाहिजे. जल्लोषाची वेळ अद्याप आलेली नाही. अर्णब, प्लीज, आपल्याला संयम बाळगला पाहिजे,” असे ट्वीट त्यांनी केले. अर्णब कशाला, सगळ्याच माध्यमांना हा संदेश कानीकपाळी ओरडून द्यायची वेळ आली आहे.

Leave a Comment