‘अभिनंदन’, ‘पुलवामा’, ‘बालाकोट’ ही नावे आरक्षित करण्यासाठी बॉलीवूडमध्ये चढाओढ

movie
गेल्या काही दिवसांमध्ये सीमेवर आणि सीमापार घडत असलेल्या घटनांनी संपूर्ण देशातील जनता अस्वस्थ आहे. एकीकडे पाकिस्तानच्या ताब्यामध्ये असलेला वैमानिक सुखरूप घरी परतण्याची सर्व जनता आतुरतेने वाट पाहत असताना दुसरीकडे मात्र अलीकडेच घडलेल्या घटनांना चित्रपटरूपात प्रदर्शित करण्याचा घाट बॉलीवूडमधील निर्माते मंडळी घालत असताना दिसत आहेत. त्यामुळे आपल्या चित्रपटाचे ‘अभिनंदन’, किंवा ‘पुलवामा’ असे आणि याच्याशी मिळते जुळते नाव अगोदरच आरक्षित करण्यासाठी बॉलीवूडमध्ये निर्मात्यांची चढाओढ सुरु झाली असल्याचे समजते.

२६ फेब्रुवारी रोजी भारताकडून सीमेपार असलेल्या अतिरेकी संघटनेच्या ट्रेनिंग कॅम्पचा हवाई हल्ल्याद्वारे संपूर्ण नायनाट केला गेल्याचे वृत्त आले मात्र, इकडे त्वरित अनेक प्रोडक्शन कंपन्यांनी याच घटनांवर आधारित चित्रपट काढण्याचा निश्चय करून या चित्रपटांची नावे आधीपासूनच आरक्षित करवून घेण्यासाठी मुंबईमधील ‘इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन’च्या कार्यालयांमध्ये गर्दी केली होती. इतकेच नव्हे, तर कोणत्या प्रोडक्शन कंपनीने कोणते ‘टायटल’ आरक्षित करायचे यावर वादंग झाल्याचे पाहायला मिळाल्याचेही वृत्त आहे.

अलीकडेच अतोनात लोकप्रियता लाभलेल्या ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक्स’ या चित्रपटाला दर्शकांचा मिळत असलेला उदंड प्रतिसाद आणि सध्या देशातील एकंदर वातावरण लक्षात घेता उरी हल्ल्यांसारख्या, किंवा अलीकडच्या काळामध्ये पुलवामामध्ये घडलेल्या घटनांवर आधारित चित्रपट काढण्यास निर्माते उत्सुक असल्याचे समजते. पुलवामामध्ये सीआरपीएफचे जवान अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झाल्यानंतरच्या काहीच दिवसांमध्ये या घटनेवर आधारित चित्रपटाचे टायटल आरक्षित करण्यासाठी किमान सात प्रोडक्शन कंपन्यांनी अर्ज दाखल केले असल्याचे समजते, तर बालाकोट येथील हवाई हल्ल्यांच्या नंतर ही अनेक कंपन्यांच्या वतीने अर्ज दाखल केले गेल्याचे समजते.

आपल्या चित्रपटाचे नाव आरक्षित करण्यासाठी कोणत्याही प्रोडक्शन हाउसला एक अर्ज भरून द्यावा लागतो. या अर्जामध्ये चित्रपटाला दिले जाणारे नाव, आणि त्याशिवाय इतर चार पाच पर्यायी नावे द्यावी लागत असून, प्रत्येक नावासाठी २५० रुपये व एकूण अठरा टक्के जीएसटी भरावा लागतो. अनेकदा चित्रपटाचे नाव आधीपासूनच आरक्षित करून ठेवल्यानंतरही हा चित्रपट बनविला जाण्याची आणि प्रदर्शित होण्याची खात्री नसते. अशा वेळी चित्रपटाच्या नावाच्या आरक्षणांची विक्री इतर प्रोडक्शन कंपनीला केली जाण्याचीही पद्धत आहे.

Leave a Comment