राणी एलिझाबेथ ठरू शकते बकिंगहॅम पॅलेसमध्ये निवास करणारी शेवटची राज्यकर्ती

palace
बकिंगहॅम पॅलेस हा भव्य शाही राजवाडा केवळ लंडनमधील पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्रच नाही, तर ब्रिटनच्या शाही घराण्याचे लंडन मधील औपचारिक निवासस्थान देखील आहे. राणी एलिझाबेथचे वास्तव्य तिच्या लहानपणापासून याच राजवाड्यामध्ये होते. तिचा विवाह इथेच पार पडला, तिच्या अपत्यांचा जन्म येथेच झाला, आणि सर्व शाही अपत्ये येथेच लहानाची मोठी झाली. आजच्या काळामध्येही प्रिन्स चार्ल्स, प्रिन्सेस अॅन, प्रिन्स अँड्र्यू आणि प्रिन्स एडवर्ड या राणीच्या चारही अपत्यांचे निवास्थान जरी इतरत्र असले, तरी यांची औपचारिक कार्यालये बकिंगहॅम पॅलेस येथेच आहेत. १८३७ साली राणी व्हिक्टोरिया या राजवाड्यामध्ये राहायला आल्यापासून गेली दोनशे वर्षे बकिंगहॅम पॅलेस हे ब्रिटनच्या राज्यकर्त्यांचे औपचारिक निवासस्थान आहे.
palace1
पण राणी एलिझाबेथचे वारस असणारे प्रिन्स चार्ल्स यांना मात्र बकिंगहॅम पॅलेसमध्ये निवास करण्याची इच्छा नसून, प्रिन्स विलियम यांचे ही त्यांच्याशी या विषयावर एकमत असल्याचे समजते. राणी एलिझाबेथनंतर प्रिन्स चार्ल्स आणि त्यांच्यानंतर प्रिन्स विलियम हे ब्रिटनचे राजे बनणार असून, त्यांचे या बाबतीतले मत अर्थातच महत्वाचे ठरते. प्रिन्स चार्ल्स यांचे वास्तव्य सध्या क्लॅरेन्स हाउस येथे असून, ब्रिटनचे राजे बनल्यानंतरही याच ठिकाणी कायमस्वरूपी राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे समजते. प्रिन्स विलीयमचे वास्तव्य केन्सिंग्टन पॅलेस येथे असून, त्याने ही कायमस्वरूपी तिथेच वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
palace2
बकिंगहॅम पॅलेसचा परिसर खूप विस्तारलेला असून, त्याचा रखरखाव करण्याच्या कामी खूप पैसा खर्च होत असतो. त्यामुळे इतक्या मोठ्या राजवाड्यामध्ये राहण्याच्या ऐवजी, आजच्या आधुनिक काळाची गरज लक्षात घेता बकिंगहॅम पॅलेसच्या मानाने खूपच लहान असलेले क्लॅरेन्स हाऊस आजच्या काळामधील गरजांच्या हिशोबाने जास्त योग्य असल्याचे प्रिन्स चार्ल्स यांचे मत आहे. चार्ल्स यांचे वास्तव्य क्लॅरेन्स हाउस येथे राहणार असले तरी त्यांचे औपचारिक कार्यालय मात्र पूर्वीप्रमाणेच बकिंगहॅम पॅलेस येथेच राहील.
palace3
तसेच सर्व औपचारिक समारंभ देखील बकिंगहॅम पॅलेस येथेच आयोजित केले जातील. सध्या राणी एलिझाबेथचे वास्तव्य या राजवाड्यामध्ये असल्याने या राजवाड्याचा थोडाच भाग पर्यटकांसाठी खुला आहे. मात्र राणीच्या मृत्युनंतर राजे बनणार असलेले प्रिन्स चार्ल्स इतरत्र वास्तव्य करणार असल्यामुळे या राजवाड्याचे आणखी काही दर्शनी भाग पर्यटकांच्या साठी खुले करण्याचा त्यांचा मानस आहे.

Leave a Comment