बुटामध्ये लपून अजगराचा १४,५०० किमीचा प्रवास

shoe
स्कॉटलंड देशाची निवासी असलेली मारिया बॉक्साल नामक महिला ऑस्ट्रेलियाहून आपल्या मायदेशी परतली. घरी आल्यानंतर आपले सामान सुटकेसमधून बाहेर काढण्यासाठी मारियाने सुटकेस उघडली आणि भीतीने तिची गाळण उडाली. मारियाच्या सुटकेसमध्ये असलेल्या तिच्या बुटामध्ये चक्क एक लहान अजगर विराजमान होते. या अजगराने मारियाच्या बुटामध्ये लपून ऑस्ट्रेलिया ते स्कॉटलंड हा तब्बल १४,५०० किलोमीटर्सचा प्रवास पार पाडला होता.
shoe1
आपल्या सामनामध्ये असलेल्या आपल्या बुटामध्ये चक्क एक अजगर असू शकते याची स्वप्नात देखील कल्पना न केलेल्या मारियाला सुटकेस उघडल्याबरोबर हे अजगर दिसले खरे, पण गम्मत म्हणून कोणी तरी एखादे खेळण्यातले नकली अजगर तिच्या बुटामध्ये लपविले असल्याची तिची समजूत झाली. तिने या अजगराला बाहेर काढण्याच्या उद्देशाने बुटाकडे हात नेला, पण तितक्यात या अजगराने हालचाल केल्यानंतर हे अजगर जिवंत असल्याचे मारियाला समजले. त्यानंतर मारियाने अजगर असलेल्या बुटावर पटकन एक आच्छादन चढविले आणि हा बूट तिने घराबाहेर नेला.
shoe3
एव्हाना मारियाच्या घराच्या मंडळींनी स्कॉटीश वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घडल्या प्रकारची माहिती दिली असल्याने हे अधिकारी देखील तातडीने मारियाच्या घरी आले आणि त्यांनी अजगर ताब्यात घेतले. ऑस्ट्रेलियामध्ये सुट्टीसाठी गेल्यानंतर आपण रहात असलेल्या हॉटेलच्या रूममध्ये एक लहानसे अजगर पाहिले होते, पण ते नंतर पुन्हा दृष्टीस पडले नसल्याचे मारिया म्हणते. मात्र एकदा दर्शन दिल्यानंतर गायब झालेले अजगर आपल्यासोबत तब्बल चौदा हजार किलोमीटर्सचा प्रवास करून इथवर येईल याची कल्पना आपण स्वप्नातही केली नसल्याचे मारियाने सांगितले.

Leave a Comment