प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांना अपत्यजन्मानंतर पाळावे लागणार हे नियम

meghan3
ब्रिटनच्या राजघराण्याचे राजकुमार प्रिन्स हॅरीचा विवाह गतवर्षी अमेरकन अभिनेत्री मेघन मार्कल हिच्यासोबत मोठ्या दिमाखात पार पडला होता. आता या दाम्पत्याला लवकरच अपत्य होणार असून, अपत्यजन्मानंतर त्वरित काही नियमांचे पालन केले जाणे या दांपत्यासाठी बंधनकारक असणार आहे. हे नियम शाही घराण्याच्या सर्व परिवारजनांना लागू असून, प्रिन्स विलियम आणि केट मिडलटन यांनी देखील त्यांच्या तीनही अपत्यांच्या जन्मानंतर या नियमांचे कसोशीने पालन केले होते. हॅरी व मेघन यांच्या अपत्याचा जन्म एप्रिल मध्ये अपेक्षित आहे.
meghan
मेघन आणि हॅरीच्या अपत्याचा जन्म झाल्यानंतर याची सर्वप्रथम सूचना राणी एलिझाबेथला दिली जाणे आवश्यक आहे. राणीला सूचित करण्याची जबाबदारी हॅरीची राहणार असून, तत्पूर्वी सोशल मिडिया, किंवा मित्रमंडळी यांना अपत्यजन्माची सूचना देता येणार नाही. राणीला अपत्यजन्माची सूचना दिल्यानंतरच इतर जवळच्या मंडळींना ही बातमी दिली जाऊ शकणार आहे. अपत्यजन्माची खबर जनतेसाठी जाहीर करण्याची जबाबदारी ‘टाऊन क्रायर’ टोनी अॅपलटन यांची असेल. प्रिन्स विलियम यांच्या तीनही अपत्यांच्या जन्माची जाहीर घोषणा देखील अॅपलटन यांनीच केली होती. तसेच केन्सिंग्टन पॅलेसच्या ट्वीटर हँडलवरही औपचारिक घोषणा केली जाईल.
meghan2
अपत्यजन्माच्या वेळी तिथे उपस्थित असणारे सर्व तज्ञ, नर्सेस आणि दाया, अपत्याबद्दल किंवा एकंदर प्रसुतीच्या प्रक्रियेबद्दल बाहेर कुठेही वाच्यता न करण्यासाठी वचनबद्ध असतात. परंपरेच्या नुसार खरे तर राजघराण्यातील सर्व शाही अपत्यांचा जन्म औपचारिक निवासस्थानी, म्हणजेच बकिंगहॅम पॅलेस येथे होणे अपेक्षित असे. खुद्द राणी एलिझाबेथच्या चारही अपत्यांच्या जन्म येथेच झाला असला, तरी प्रिन्सेस डायनाने मात्र ही परंपरा दूर करून तिच्या दोन्ही प्रसूती इस्पितळामध्ये करविण्याचा निर्णय घेतला होता. हिच परंपरा पुढे केट मिडलटनने सुरु ठेवली. त्याचप्रमाणे प्रसुतीच्या वेळी केवळ स्त्रियांनी त्या ठिकाणी उपस्थित असावे हे परंपरा देखील डायना आणि चार्ल्स यांच्या अपत्य जन्माच्या वेळी संपुष्टात आली.

Leave a Comment