बंडीपूर जंगलातील आग लागली का लावली?

fire
संपूर्ण देश पाकिस्तानसोबतच्या संघर्षात मग्न असताना तिकडे दक्षिणेत एक भयानक घटना घडत होती. कर्नाटक आणि तमिळनाडूच्या सीमेवर असलेले बंडीपूर अभियारण्य तब्बल चार दिवस जळत होते. देशातील अग्रगण्य व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेले बंडीपूर अभयारण्य अनेक वन्य प्राण्यांचे निवासस्थान असून तेथील वनसंपदाही मोठी आहे. ही वनसंपदा चार दिवस अग्निप्रलयात सापडली होती आणि अथक संघर्षानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. यात फारसे नुकसान झाले नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला असला, तरी पर्यावरणाच्या दृष्टीने ही अत्यंत चिंताजनक गोष्ट म्हणायला हवी.

कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात गोपाळस्वामी बेट्टा पर्वतरांगांमध्ये बंडीपूर राष्ट्रीय अभियारण्य वसलेले आहे. शनिवारी संध्याकाळी या अभयारण्यात आग लागली आणि मंगळवारी संध्याकाळी ही आग आटोक्यात आणण्यात वनाधिकाऱ्यांना यश आले. ही आग मुदुमलाई आणि वायनाड अभयारण्यातही पसरली होती. ही आग विझविण्यासाठी सोमवारी दुपारी भारतीय हवाई दलाच्या बांबी बकेट हेलिकॉप्टरांना पाचारण करण्यात आले. मंगळवारी सकाळी 7.30 च्या सुमारास दोन हेलिकॉप्टरांनी वनाधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या जागी आकाशातून पाण्याची फवारणी केली. तेव्हा कुठे दोन तासांनंतर ही आग शमली.

सहाय्यक वन संरक्षक रविकुमार आणि गोपाळस्वामी बेट्टा क्षेत्र वनाधिकारी पुट्टस्वामी या दोन अधिकाऱ्यांनी ही आग संपुष्टात आल्याची पुष्टी केली. लँटाना नावाचे तण फोफावल्यामुळे ही आग पसरण्यास मदत झाली आणि त्यामुळे आग विझविण्यास अडचणीही आल्या, असे त्यांनी सांगितले.
सुदैवाने या आगीत फारशा झाडांचे नुकसान झाले नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. आग नियंत्रित करणे कठिण गेले असले तरी फार झाडांचा नाश झालेला नाही. काही लहान वृक्ष नष्ट झाले असले तरी मोठ्या आणि जुन्या वृक्षांना फारसे नुकसान झालेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या अभयारण्यात जिथे आग लागली होती त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचे सांगाडे मिळाले नसल्याचाही दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

त्यामुळे वाघ, हरिण, हत्ती यांसारखे प्राणी या आगीपासून वाचले असतील अशी आशा सध्या तरी उत्पन्न झाली आहे. या आगीमुळे उद्ध्वस्त झालेल्या भागाच्या पुन्हा सुस्थितीत येण्यासाठी पुढील दोन महिने महत्त्वाची ठरतील. तेथे अधिकाऱ्यांना लक्ष ठेवावे लागेल.

दुसरीकडे तमिळनाडूतील 300 एकर अभयारण्य या आगीमुळे नष्ट झाले आहे. काही समाजकंटकांनी ही आग लावली असल्याचा आरोप तमिळनाडूतील अधिकाऱ्यांनी केला आहे. तमिळनाडूत येणाऱ्या अभयारण्याला मुदुमलाई टायगर रिझर्व्ह (एमटीआर) या नावाने ओळखण्यात येते. कधी काळी तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये उच्छाद मांडलेल्या वीरप्पन या कुख्यात तस्कराचे हे घर. चंदनाची झाडे आणि हस्तिदंताची तस्करी हा वीरप्पनचा मुख्य व्यवसाय! त्याचा खात्मा 18 ऑक्टोबर 2004 रोजी करण्यात आला होता. तोपर्यंत त्याने 900 हत्तींचा बळी घेतला होता. यावरून या जंगलाची समृद्धी लक्षात येईल.

बंडीपूरमध्ये जे काम हवाई दलाच्या हेलिकॉप्टरांनी केले त्यासाठी एमटीआरमध्ये 200 तात्पुरत्या मजुरांना कामाला लावण्यात आले होते. एमटीआरच्या मध्यभागातील तसेच झालर क्षेत्रातील (बफर झोन) सुमारे 250 एकर वनाला या आगीची झळ पोचली असल्याचे एमटीआरचे क्षेत्र संचालक दीपक श्रीवास्तव यांनी सांगितले. याशिवाय वन अधिकाऱ्यांनी आग रोखण्यासाठी प्रति-आग नावाचे तंत्र वापरल्यामुळे आणखी 50 एकर वनाचे नुकसान झाले.
प्रति-आग या तंत्रात जंगलातील आग रोखण्यासाठी आणखी एक आग जाणूनबुजून लावली जाते. ही प्रति-आग जमिनीवर असलेले बहुतांश ज्वलनशील पदार्थ गिळंकृत करते आणि त्यामुळे जळीत जमिनीचा एक पट्टा तयार होता. त्यामुळे वनातील मूळ आग एका भागाकडून दुसरीकडे पोचत नाही आणि वनाचे रक्षण होते. एमटीआरमध्ये बहुतांश वाळलेले गवत, सुकी झाडे आणि वाऱ्यामुळे पडलेली झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

बंडीपूर अभयारण्य हे 1974 मध्ये राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पांतर्गत संरक्षित अरण्य म्हणून स्थापन करण्यात आले आहे. भारतातील वाघांची सर्वाधिक संख्या कर्नाटकात आहे. हे अरण्य कधी काळी म्हैसूरच्या महाराजांच्या खासगी शिकारासाठी राखीव होते. हे अभयारण्य 874 चौरस किलोमीटरवर पसरलेले असून भारतातील अनेक दुर्मिळ वन्यजीवांना त्यामुळे संरक्षण मिळाले आहे. हत्ती, वाघ, अस्वल, अजगर, सांबर इ. अनेक प्राणी येथे मोठ्या संख्येने आढळतात. इतकेच नव्हे तर बंडीपूरसह नागरहोळ अभयारण्य (643 चौ. किमी), मुदुमलाई अभयारण्य (320 चौ. किमी) आणि वायनाड अभयारण्य (344 चौ. किमी) या चार अभयारण्यांचा मिळून एकूण 2.183 चौ. किमी क्षेत्राचे निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह तयार होते. भारतातील हे सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र असून दक्षिण आशियातील वन्य हत्तींची सर्वाधिक संख्या येथे आहे. त्यामुळे या वनाचे हे अग्निकांड सर्वांच्याच चिंतेचा विषय व्हायला हवा.

Leave a Comment