या कंपनीच्या ‘ग्रासफेड घी ऑईल’मुळे भारतीय पडले बुचकळ्यात

oil
घरचे लोणकढे साजूक तूप आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायद्याचे असते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. घरी लोणी कढवून त्यापासून निघत असलेल्या साजूक तुपाचा वापर स्वयंपाकापासून ते औषधांमध्येही वापरले जाण्याची परंपरा आपल्याकडे फार प्राचीन काळापासून आहे. त्यामुळे भारतातील घराघरात आणि जगामध्ये इतरत्र राहणाऱ्या भारतीयांच्या घरातही तूप हा पदार्थ हमखास आढळणारा आहे. त्यामुळे लॉस एंजिलीस मधील एका अमेरिकन कंपनीने जेव्हा ‘ग्रास फेड घी ऑइल’ बाजारात आणले, तेव्हा हा प्रकार नक्की आहे तरी काय हे न समजल्यामुळे परदेशामध्ये राहणारे भारतीय काहीसे बुचकळ्यात पडले आहेत.

लॉस एंजिलीस येथील ‘फोर्थ अँड हार्ट’ नामक कंपनीने हे ‘घी-ऑईल’ बाजारामध्ये आणले आहे. मात्र यामध्ये शुद्ध साजूक तूप नसून तुपाच्या सोबत इतर तेले मिसळून हे ‘घी-ऑईल’ बनविण्यात आले असल्याने स्तिमित आणि काहीशा नाराज झालेल्या भारतीयांच्या प्रतिक्रिया ट्वीटरवर पहावयास मिळत आहेत. कंपनीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीच्या अनुसार या घी-ऑईलमध्ये तूप आणि ग्रेपसीड ऑईलचे मिश्रण असून, बेकिंग पासून फ्राईंग पर्यंत सर्व प्रक्रियांसाठी हे घी-ऑईल वापरता येण्यासारखे असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

मात्र हे घी-ऑईल ज्यांनी वापरून पाहिले आहे, त्यांच्या पदरी मात्र थोडी निराशाच आली आहे. य बद्दलही लोकांनी ट्वीटरवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून त्यांमध्ये नाराजीचा सूरच जास्त दिसून येत आहे. हे घी-ऑईल तुपासारखे दिसत असले, तरी तुपाचे गुण यामध्ये खचितच नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. देशी पदार्थांना विदेशी मेकअप करून ते पदार्थ बाजारामध्ये मोठ्या किंमतींना विकण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. काही काळापूर्वी भारतामध्ये वीस ते चाळीस रुपयांना मिळणाऱ्या नारळाच्या करवंट्या तब्बल बाराशे रुपयांना ऑनलाईन बिक्रीसाठी उपलब्ध होत्या. तसेच देशी, हळद घातलेले दुध परदेशामध्ये ‘टर्मरिक लाटे’ म्हणून चांगलेच लोकप्रिय आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर हिने देखील स्वतःचा उल्लेख ‘घी नॅशनलिस्ट’ म्हणून करीत या घी-ऑईलवर ट्वीटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

Leave a Comment