‘गुडलक’साठी चक्क विमानाच्या इंजिनमध्ये फेकली नाणी !

coin
आपण करीत असलेल्या कामाला सुरुवात करताना त्यामध्ये आपल्याला यश मिळावे म्हणून नारळ फोडणे, किंवा एखादी व्यक्ती प्रवासाला निघाली की तिचा प्रवास बिनदिक्कत पार पडावा या करिता तिच्या हातावर दही देणे, या आणि अशा अनेक गोष्टींची परंपरा आपल्याकडे शतकानुशतके सुरु आहे. या गोष्टींमुळे आपल्याला यश मिळत असून भाग्योदय होतो अशी मान्यता आपल्याकडे रूढ आहे. पण केवळ भारतामध्येच नाही, तर जगभरातील इतर सर्वच देशांमध्ये अशा प्रकारच्या परंपरा रूढ आहेत. रोम देशामध्ये अतिशय सुप्रसिद्ध असलेल्या ‘द फोर रिव्हर्स’ या भव्य कारंज्यामध्ये नाणे टाकून आपली मनोकामना पूर्ण करून घेता येत असल्याचे म्हटले जाते. त्याचप्रकारे चीनमध्ये ‘गुडलक’ किंवा शुभ शकून म्हणून नाणे टाकण्याची परंपरा रूढ आहे. मात्र एका चीनी प्रवाश्याने गुड लक साठी टाकलेले नाणे, त्याच्यासाठी ‘अनलकी’ ठरले असून, त्याची रवानगी चक्क तुरुंगामध्ये करण्यात आली आहे.
coin1
या प्रवाश्याने गुड लक साठी टाकलेली नाणी रस्त्यावर किंवा पाण्यामध्ये टाकली नसून, चक्क विमानाच्या चालू इंजिनमध्ये टाकली. त्यामुळे अर्थातच विमानाच्या इंजिनमध्ये होऊ शकणारे संभाव्य बिघाड लक्षात घेऊन ही फ्लाईट रद्द करण्यात आली. याने विमान कंपनीचे नुकसान तर झालेच, पण त्याशिवाय या विमानाने प्रवास करणार असलेल्या सर्व प्रवाश्यांचाही चांगलाच खोळंबा झाला. ही घटना चीनमधील अँकिंग तियानझुशान विमानतळावर घडली असून, ज्या कंपनीचे हे विमान होते त्या कंपनीचे नावही योगायोगाने ‘लकी एअर’ आहे.
coin2
विमानाजवळ असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना विमानाच्या इंजिनजवळ जमिनीवर काही नाणी पडलेली आढळली. चौकशीअंती लु नामक २८ वर्षीय युवकाने विमानाच्या इंजिनमध्ये नाणी भिरकावली असल्याची कबुली दिली. विमानाचा प्रवास सुरक्षित व्हावा या साठी आपण ही नाणी इंजिनमध्ये फेकली असल्याचे लु ने सुरक्षा कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यानंतर या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले असून, त्यापायी तब्बल १६२ प्रवाश्यांची गैरसोय झाली. तसेच विमान कंपनीला देखील सुमारे वीस हजार डॉलर्सचे नुकसान सोसावे लागले असून, विमान कंपनीने केलेल्या तक्रारीवरून संबंधित युवकाला अटक करण्यात आली असल्याचे ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. विमानाचा प्रवास सुरक्षित पार पडावा यासाठी प्रवाश्यांनी विमानाच्या इंजिनमध्ये नाणी फेकण्याचा हा पहिलाच प्रसंग नसून, या पूर्वीही २०१७ साली एका ऐंशी वर्षीय वृद्ध प्रवाश्याने शांघाई येथून प्रस्थान करणाऱ्या विमानामध्ये नाणी फेकण्याचा ‘पराक्रम’ केल्याने त्यामुळे प्रवाश्यांना अनेक तास विमानतळावरच मुक्काम करावा लागला होता.

Leave a Comment