मेघना गुलझारने दीपिकाला ‘छपाक’ची कथा ऐकविली तेव्हा…

deepika-padukone
समाजातील अतिशय संवेदनशील विषयांच्या बाबतीत स्पष्टपणे आपली मते मांडणारी अभिनेत्री म्हणून दीपिका पदुकोनचा लौकिक आहे. एकेकाळी डिप्रेशनशी लढा दिलेल्या दीपिकाने आपल्या या लढ्याचा उल्लेख जाहीररीत्या करून त्यातून अनेकांना मानसिक नैराश्याशी लढण्याची प्रेरणा दिली आहे. म्हणूनच ‘छपाक’ या दीपिकाच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होण्यापूर्वी जेव्हा या चित्रपटाची कथा सुप्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका मेघना गुलझारने दीपिकाला प्रथम ऐकविली तेव्हाचा तो अनुभव दोघींना ही अतिशय हळवे करून गेला.
deepika-padukone2
लक्ष्मी अगरवाल नामक एका धैर्यशील युवतीची ही कहाणी आहे. लक्ष्मी अॅसिड अटॅक सर्व्हायव्हर असून, तिच्या आयुष्यावर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. लक्ष्मीची भूमिका दीपिका साकारणार असून, विक्रांत या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी दीपिका आणि विक्रांत यांनी लक्ष्मी अगरवाल आणि अशोक यांची प्रत्यक्षात भेटही घेतली असल्याचे समजते. या निमित्ताने ज्यांच्या आयुष्यांवर आधारित भूमिका आपण साकारत आहोत त्यांच्या आयुष्यांच्या बद्दल जवळून जाणून घेण्याची संधी दीपिका आणि विक्रांतला मिळाली. लक्ष्मीच्या आयुष्याची कहाणी ऐकून दीपिका अत्यंत प्रभावित झाली असल्याचे समजते.
deepika-padukone1
दीपिकाला ‘छपाक’चे कथानक मेघनाने ऐकविल्यानंतर दोघींनाही आपले अश्रू आवरणे कठीण झाले. पण आपल्या भावनांना आवर घालत चित्रपटाच्या कथानकावरवर दोघींनी आपली चर्चा सुरु ठेवली. या कथानकाचे पुन्हा पुन्हा वाचन न करण्याचा निर्णय मेघनाने घेतला असून, त्यामुळे कथेमध्ये उत्स्फूर्तता राहील असे मेघनाचे मत असल्याचे समजते. दीपिकाची आणखी एक अतिशय प्रभावी भूमिका पहावयास मिळणार या कल्पनेने दर्शक देखील या चित्रपटाची आतुरतेने वात पाहत आहेत.

Leave a Comment