भारतामध्ये आहेत अशी ही अजब मंदिरे !

temple
भारत देश वैविध्यपूर्ण संस्कृती आणि अनेक धार्मिक मान्यतांसाठी ओळखला जातो. हिंदू पौराणिक कथांच्या अनुसार एकूण तेहतीस कोटी देवता असल्याचे म्हटले जात असून, बहुतेक सर्व देवतांचे पूजन भारतातील निरनिराळ्या प्रांतांमध्ये निरनिराळ्या प्रकारे केले जात असते. यातील अनेक देवतांशी निगडित अनेक आख्यायिका देखील प्रसिद्ध असून, त्या कथारूपात आपण सर्वच बालपणापासून ऐकत आलो आहोत. पण या देवतांना समर्पित असलेल्या मंदिराच्या खेरीज भारतामध्ये काही मंदिरे अशीही आहेत, जी सामान्य आहेतच पण त्या शिवाय ती मंदिरे कोणाला समर्पित आहेत हे कळल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही.
temple1
तेलंगाणामधील माल्लियल गावामध्ये चक्क सोनिया गांधींचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये कॉंग्रेसच्या पूर्व अध्यक्षा सोनिया गांधी यांची चक्क देवी रूपातील प्रतिमा आहे. इतकेच नव्हे, तर गांधी परिवारातील इतर व्यक्तींच्या मूर्ती देखील या मंदिरामध्ये आहेत. या मंदिराची निर्मिती २०१४ साली करविण्यात आली असून, तेलंगाणा राज्याची स्थापना झाल्याच्या निमित्ताने या मंदिराचे निर्माण करविण्यात आले होते. या मंदिरामध्ये ठेवण्यात आलेला सोनिया गांधी यांचा नऊ फुट उंचीचा पुतळा राजस्थानमधील कारागिरांनी बनविलेला होता.
temple2
राजस्थानमध्ये एका रॉयल एन्फिल्ड मोटरसायकलचे मंदिर असून या मंदिराला ‘ओम बन्ना’ मंदिर या नावाने संबोधले जाते. ही मोटरसायकल चालविणाऱ्या ओम सिंह राठोड नामक युवकाच्या स्मृती प्रीत्यर्थ हे मंदिर येथे बनविण्यात आले असून, या युवकाचा १९८८ साली अपघाती मृत्यू झाला होता. या युवकाला सर्व ग्रामस्थ ओम बन्ना या नावाने ओळखत असत. ओम सिंहचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी ही अपघातग्रस्त मोटरसायकल पोलिस स्थानकामध्ये आणली खरी, पण काहीच वेळाने ही मोटर सायकल तेथून गायब होऊन पुन्हा अपघातस्थळी पोहोचली. असे वारंवार घडल्यानंतर अखेरीस ही मोटरसायकल तिथेच उभी करून तिथे ओम सिंहचे स्मारक बांधण्यात आले. आता अपघातांपासून आपले रक्षण व्हावे या साठी मोटरसायकलस्वार मोठ्या श्रद्धेने ओम बन्ना मंदिरामध्ये पूजा करीत असतात.
temple3
कोलकता येथे असणारे चायनीज काली मंदिर एक चमत्कारी स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराचे पुजारी मूळचे चायनीज असून, प्रसाद म्हणून या देवीला चक्क नूडल्स अर्पण केल्या जातात. विशेष गोष्ट अशी, की देवीचे पूजन देखील चायनीज परंपरांच्या अनुसार केले जाते. त्यामुळे कधी कोलकाता येथे काही निमित्ताने जाणे झालेच तर या मंदिराला अवश्य भेट द्यावी. त्याचप्रमाणे जयपूर येथील ‘मंकी टेम्पल’ पाहण्यासाठी देखील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. या मंदिरामध्ये असंख्य माकडे मुक्त संचार करीत असलेली पहावयास मिळतात. राजस्थानमधील बिकानेर शहराच्या जवळ असलेले करणी माता मंदिर ‘चूहा मंदिर’ या नावाने देखील ओळखले जाते. या मंदिराच्या परिसरामध्ये मोठमोठ्या उंदीरांचा मुक्त संचार असून, आपले पूर्वज येथे उंदीर रूपाने आले असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. तसेच ज्यांना मंदिराच्या परिसरामध्ये पांढरा उंदीर दिसेल त्यांचा भाग्योदय होत असल्याची मान्यता येथे रूढ आहे.

Leave a Comment