‘सत्यमेव जयते’नंतर आमिरला घ्यावी लागली होती मानसोपचार तज्ञांची मदत

amir-khan
आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाला दर्शकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. मात्र या कार्यक्रमाचे चित्रीकरण होत असताना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या पाहुण्यांशी संवाद साधणे, त्यांचे अनुभव ऐकणे, आणि त्यांना जे सोसावे लागले ते जाणून घेतल्यानंतर केवळ प्रेक्षकांनाच नव्हे, तर अनेकदा आमिरला ही अश्रू अनावर होत असत. या सर्व लोकांची दु:खे जाणून घेत, या मंडळींचे अनुभव ऐकताना त्या सर्वच गोष्टींचा आमिरच्या मनावर इतका खोल परिणाम झाला, की त्या मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्याला मानसोपचार तज्ञांची मदत घ्यावी लागली असल्याचे स्वतः आमिर खानने म्हटले आहे. ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमामध्ये अतिशय संवेदनशील विषयांवर चर्चा होत असून, समाजामध्ये आजच्या काळामध्येही अस्तित्वात असलेल्या कन्याभ्रूण हत्या, लहान मुलांवर होत असणारे लैंगिक अत्याचार, ‘ऑनर किलिंग’ यांसारख्या अनेक गंभीर विषयांवर चर्चा होत असत.

सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या प्रथम सीझनच्या चित्रीकरणाच्या वेळचे आपले अनुभव अतिशय अस्वस्थ करणारे असल्याचे आमिर म्हणतो. त्या काळामध्ये आपल्या मनावर असणारा ताण इतका वाढला होता, की सामान्यपणे आयुष्य जगणे केवळ अशक्य होऊन बसले असून, आपण चारचौघांमध्ये मिसळणे सोडून दिले असल्याचे आमिर म्हणतो. त्यावेळी आपली मनस्थिती अतिशय नाजूक असून, कोणत्याही क्षणी आपल्याला नैराश्य घेरून टाकत असल्याची कबुलीही आमिरने दिली आहे. लोकांचे दु:खदायक अनुभव ऐकताना ते एखाद्या तिऱ्हाइतासारखे ऐकणे आणि त्यामुळे स्वतःला प्रभावित होऊ न देणे याची आपल्याला सवय नसल्याचे आमिर म्हणतो. ‘गिव्हिंग मॅटर्स’ या ‘NASSCOM टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम’ च्या वतीने आयोजित चर्चासत्रामध्ये बोलत असताना आमिरने आपले हे अनुभव कथन केले आहेत. सत्यमेव जयते या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या पाहुणे मंडळींचे अनुभव आपल्याला अधिक समजूतदार आणि संवेदनशील बनवून गेले असल्याचेही आमिर म्हणाला.

Leave a Comment