अशी असते रशियन अंतराळवीरांची ‘सर्व्हायव्हल किट’

kit
पृथ्वीवरून अंतराळामध्ये यान पाठवून त्यामध्ये असणारे अंतराळवीर त्यांच्या मिशनच्या दरम्यान सुरक्षित राहावेत ही अतिशय मोठी जबाबदारी असल्याने या साठी असंख्य इंजिनियर्स, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, वैमानिक यांचे अथक परिश्रम आवश्यक असतात. तसेच अंतराळातील आपली मिशन पूर्ण करून पृथ्वीवर परतणे हे देखील कमी धोक्याचे काम नसते. अमेरिकन अपोलो मिशनसाठी अंतराळामध्ये गेलेले अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर समुद्रामध्ये उतरत असले, तरी रशियाचे अंतराळवीर मात्र कझकस्तानच्या वाळवंटामध्ये उतरत असतात, किंवा निदान तसा प्रयत्न तरी करीत असतात.

ज्या काळी पृथ्वीवरून अंतराळामध्ये अनेक मिशन्ससाठी अंतराळवीर पाठविले जाऊ लागले, त्याकाळी अंतराळयान मिशन पूर्ण करून पृथ्वीवर परतत असताना त्याचे लँडिंग नक्की कुठे होऊ शकेल याचे गणित मांडणे मोठे कठीण काम असे. कारण जेव्हा अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेमध्ये परतत असे, तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे भयंकर वेगाने हे यान पृथ्वीच्या दिशेने येत असे. हे यान पृथ्वीकडे येत असताना अगदी किरकोळ तांत्रिक बदलांमुळे देखील आधी ठरलेल्या लँडिंग स्पॉटच्या ऐवजी हे यान हजारो मैल भरकटण्याची देखील शक्यता असे. अशा वेळी ठरलेल्या ठिकाणी लँड न होता यान भलत्याच ठिकाणी जाऊन पोहोचले, तर त्यातील अंतराळवीरांना पुढची मदत उपलब्ध होईपर्यंत आवश्यक त्या सर्व वस्तूंनी भरलेली एक सर्व्हायव्हल कीट दिली जात असते. आजच्या काळातील तांत्रिक प्रगतीमुळे लँडिंगची गणिते सहसा चुकत नसली, तरी अंतराळ वीरांकडे ही सर्व्हायव्हल कीट असतेच.

अंतराळवीरांना देण्यात येणाऱ्या या सर्व्हायव्हल किटमध्ये एक दिशादर्शक यंत्र, एक लायटर, एक काडेपेटी, आपण कुठे आहोत याची सूचना देण्यासाठी एक सिग्नल मिरर, एक फिशिंग कीट, टॉर्च, एक लहानशी करवत, अत्यावश्यक औषधे, काही कोरडे अन्नपदार्थ आणि रिहायड्रेटिंग फूड बार्स अशा वस्तू या सर्व्हायव्हल किटमध्ये असतात. तसेच अंतराळामध्ये गेलेले अंतराळवीर पृथ्वीवर परतत असताना तिथे असणारे हवामान लक्षात घेऊन त्यानुसारही काही वस्तूंचा समावेश या किटमध्ये केला जातो. अंतराळवीर सायबेरियामध्ये देखील उतरू शकण्याची शक्यता लक्षात घेऊन किटमध्ये अल्युमिनियमचे तळवे असलेले शूज, स्नो ब्लाईंडनेस पासून बचाव करण्यासाठी गॉगल्स आणि आवश्यकतेनुसार गरम कपड्यांचा देखील या किटमध्ये समावेश केला जातो. अंतराळवीरांचा सामना क्वचित जंगली जनावरांशी देखील होऊ शकतो हे लक्षात घेऊन त्यांपासून उद्भाविणारा धोका लक्षात घेता एके काळी बंदुकीचा किंवा अन्य शस्त्रांचा समावेश देखील या किटमध्ये केला जात असे.

Leave a Comment