बहुगुणी चंदनबटवा

bathua
बद्धकोष्ठ, पोटामध्ये गॅसेस, अपचन या समस्या आजच्या काळामध्ये सामान्य झाल्या आहेत. संतुलित आहार, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, मानसिक तणाव या सर्व गोष्टींच्या पातळीमध्ये वाढ होऊ लागल्याने पचनाशी निगडित विकार देखील वाढताना दिसू लागले आहेत. या समस्यांसाठी वारंवार औषधोपचार करण्यापेक्षा आपल्या दैनंदिन आहारामध्ये काही पदार्थ समाविष्ट केल्याने आणि काही पदार्थ वगळल्याने या समस्या पुष्कळ अंशी कमी होतात. त्या दृष्टीने चंदनबटवा ही हिरवी पालेभाजी गुणकारी मानली गेली आहे. या भाजीमध्ये अ जीवनसत्व, कॅल्शियम, फॉस्फोरस, आणि पोटॅशियम मुबलक मात्रेमध्ये आहेत. या पालेभाजीमध्ये लोह आणि फायबरही आहे. चंदनबटव्याची पालेभाजी थंडीच्या दिवसांमध्ये सहज उपलब्ध होणारी भाजी आहे. या पालेभाजीच्या सेवनाने किडनी स्टोन होण्याचा धोका टाळता येऊ शकतो. तसेच ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांनी तीन ग्लास पाण्यामध्ये अर्धा किलो चंदनबटव्याची भाजी घालून हे पाणी चांगले उकळून घ्यावे. त्यानंतर हे पाणी गाळून घेऊन कोमट असतानाच त्यामध्ये थोडी काळी मिरी पूड, थोडेसे सैंधव आणि किंचित लिंबाचा रस घालून त्याचे सेवन दररोज करावे.
bathua1
ज्यांना दातांशी किंवा हिरड्यांशी निगडित काही विकार असतील त्यांनी चंदनबटव्याची ताजी पाने दररोज स्वच्छ धुवून चावून खावीत. यामुळे तोंडामध्ये उष्णतेने आलेले अल्सर, किंवा श्वासाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. तोंडातील कीटाणू नष्ट करणारी तत्वे चंदनबटव्यामध्ये मुबलक मात्रेमध्ये असल्याने दातांशी किंवा हिरड्यांशी निगडित विकारांवर चंदनबटवा गुणकारी आहे. त्याचप्रमाणे या भाजीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असून, त्यामुळे ज्यांना वारंवार बद्धकोष्ठाचा त्रास होतो त्यांच्यासाठी या भाजीचे सेवन चांगले आहे. त्यामुळे बद्धकोष्ठ किंवा पचनाशी निगडित इतर समस्या असल्यास आठवड्यातून तीन ते चार वेळा चंदनबटव्याची भाजी आहारामध्ये समाविष्ट करावी. या भाजीमध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम प्रचुर मात्रेमध्ये असल्याने ज्यांना वारंवार सांधेदुखी किंवा स्नायूंमध्ये वेदना होतात त्यांनी या भाजीचा समावेश आपल्या आहारामध्ये अवश्य करावयास हवा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment