तब्बल पासष्ट वर्षांनंतर सापडली हायस्कूलमध्ये असताना हरविलेली हँँडबॅग!

handbag
८२ वर्षीय मार्था इना इंगहॅम हिच्या पर्यंत अकस्मात पोहोचलेली बातमी तिने ऐकली, तेव्हा क्षणभर तिचा त्यावर विश्वासच बसेना. तब्बल पासष्ट वर्षांपूर्वी हरविलेली तिची हँडबॅग त्यातील काही वस्तूंसह तिला परत मिळाली होती. जानेवारी महिन्यामध्ये इंडियानामधील जेफरसन हायस्कूलची इमारत पुनर्निर्माणासाठी पाडत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही हँडबॅग सापडली. त्यामध्ये मार्थाचे ओळखपत्र होते, पण तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यावर तिच्या घराचा पत्ता किंवा दूरध्वनी क्रमांक मात्र नव्हता. त्यामुळे मार्थाला शोधून काढण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी अखेर सोशल मिडीयाचा वापर करण्याचा निर्णय घेतला.
handbag1
सोशल मिडीयावर मार्थाच्या ओळखपत्राचे छायाचित्र पोस्ट करण्यात येऊन तिची सापडलेली हँडबॅग तिच्यापर्यंत किंवा तिच्या परिवारजनांपर्यंत पोहोचविण्यासाठी मदतीचे आवाहनही नागरिकांना या पोस्ट द्वारे करण्यात आले. सुदैवाने मार्थाच्या एका नातेवाईकाने ही पोस्ट सोशल मिडीयावर पाहिली आणि सुमारे एक हजार मैलांच्या अंतरावर फ्लोरिडामध्ये वास्तव्य असणाऱ्या मार्थाला त्याने त्वरित याबद्दल सूचना दिली. त्यानंतर मार्थाने अर्थातच बांधकाम कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, तिची हँडबॅग तिच्यापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली.
handbag2
१९५४ साली हरविलेली मार्थाची हँडबॅग तिला परत मिळाली आणि त्याचबरोबर अनेक जुन्या आठवणी देखील जाग्या झाल्या. मार्थाला तिच्या हँडबॅगमध्ये एक रिबन आणि च्युईंग गमचे रॅपर सापडलेच, पण त्याचबरोबर तिच्या वर्गातील एका मुलाने त्याचे प्रेम व्यक्त करणारे आणि मार्थाने त्याच्यासोबत ‘प्रॉम’ला चलण्याची विनंती करणारे एक प्रेमपत्रही त्या हँडबॅगमध्ये होते. आजवर ज्या घटना विस्मृतीत गेल्या होत्या, त्या घटनांच्या आठवणी या हँडबॅगमुळे पुन्हा ताज्या झाल्याचे समाधान आपल्याला असल्याचे मार्था म्हणते.

Leave a Comment