या लहानग्याने इतक्या कमी वयातच केली आहे चोवीस देशांची भ्रमंती

andre
क्लूज-नापोका या रोमेनियामधील प्रांताचे निवासी असलेले आंद्रे आणि अलीना सिक्लान यांचा दोन वर्षांचा मुलगा एरिक याने इतक्या लहान वयातच आपल्या आईवडिलांच्या समवेत पाच महाखंड आणि चोवीस देश पालथे घातले आहेत. सातत्याने त्याच त्याच दिनक्रमाला कंटाळलेल्या आंद्रे आणि अलीनाने गतवर्षी जून महिन्यामध्ये घराबाहेर पडून बाहेरील जग पाहण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून त्यांची भटकंती सातत्याने सुरुच आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये हे दांपत्य आपल्या दोन वर्षांचा मुलगा एरिक याच्यासमवेत जगप्रवासाला बाहेर पडले आहे. एरिकने आजवर आपल्या आईवडिलांच्या समवेत जगातील अनेक सुप्रसिद्ध पर्यटनस्थळे पहिली आहेत. यामध्ये पेरू देशातील माचूपिचू, थायलंड येथील भव्य, सुंदर मंदिरे आणि आणि फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस स्टेशनचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर कॅरीबियन आणि मेक्सिकोला ही या कुटुंबाने भेट दिली आहे.

अलीना एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये फायनॅन्स मॅनेजर म्हणून कार्यरत असून, आंद्रे व्यवसायाने डेंटिस्ट आहे. आपापल्या कामांमध्ये सतत व्यस्त असलेल्या या दाम्पत्याला आपल्या मुलासाठी वेळ देणे शक्य नसे. तसेच दोघांच्याही कामाचा व्याप मोठा असल्याने मुलाला कुठे फिरायला नेणेही शक्य होत नसे. आंद्रे आणि अलीना या दोघांनाही प्रवासाची अतिशय आवड असल्याने त्यांनी अखेरीस आपला कामाच्या व्याप सांभाळत असतानाच मुलासोबत जगभ्रमंती करण्याचा निर्णय घेतला.
andre 1
त्यानुसार एरिक अगदी लहान असताना जवळपासचे प्रदेश या दाम्पत्याने फिरून पाहिले. त्यानंतर एरिक सहा महिन्यांचा झाल्यानंतर या दाम्पत्याने इटलीमध्ये तीन आठवड्यांची ‘रोड ट्रीप’ केली. लहानग्या एरीकला घेऊन लांबवर प्रवास करण्याचा त्यांचा पहिलाच अनुभव अतिशय चांगला ठरल्याने या दाम्पत्याने एरिकला सोबत घेऊन पुढे अनेक लांबवरचे प्रवास केले. प्रवास करताना अतिशय मोजके सामान बरोबर घेऊन, शक्य तितक्या स्वस्त हॉटेल्समध्ये मुक्काम करून हे दाम्पत्य आपल्या प्रवासादरम्यान होणारा खर्च नियंत्रित ठेवते. अनेक ठिकाणी या दाम्पत्याने सोशल मिडीयावर प्रसिद्ध केलेल्या उत्तम रिव्ह्यूजच्या बदल्यात त्यांची मोफत राहण्याची व्यवस्था देखील होत असते. आपल्या जगभ्रमंतीमुळे आपल्याबरोबरच आपल्या मुलाला देखील खूप काही शिकायला मिळत असल्याचे समाधान या दाम्पत्याला आहे.

Leave a Comment