दिवसा नाईट गाऊन घालून घराबाहेर पडल्यास या गावामध्ये महिलांना दंड

gown
आंध्र प्रदेशातील एका गावामध्ये एक विचित्र नियम लागू करण्यात आला आहे. टोकलपल्ली नामक या गावामध्ये राहणाऱ्या वडिलधाऱ्या मंडळींच्या आग्रहाखातर हा नियम लागू करण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार या गावामध्ये राहणाऱ्या महिलांनी दिवसाच्या वेळी नाईट गाऊन परिधान केलेला आढळला, तर संबंधित महिलेला दोन हजार रुपयांचा दंड करण्याचा निर्णय गावामध्ये एकमताने घेण्यात आला आहे. तसेच दिवसाच्या वेळी नाईट गाऊन घातलेल्या महिलेसंबंधी माहिती देणाऱ्याला एक हजार रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणाही या नियमाअंतर्गत करण्यात आली आहे.

टोकलपल्ली हे गाव आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यामध्ये असून, या गावामध्ये सुमारे अकरा हजार परिवार आहेत. या गावामध्ये हा विचित्र नियम लागू होऊन काही अवधी उलटून गेला आहे, मात्र सरकारी अधिकाऱ्यांनी या गावाला भेट दिली असता, या नियमावर हरकत घेणारी एकही तक्रार त्यांच्यासमोर आली नसल्याचे समजते. या विचित्र नियमाच्या द्वारे वसूल केलेला दंड गावाच्या विकासकार्याच्या कामी खर्च केला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असून, हा नियम लागू झाल्यानंतर आतापर्यंत एकाही महिलेला दंड ठोठाविण्याची वेळ आलेली नाही. हा नवा नियम गावातील महिलांच्या सहमतीनेच घेण्यात आला असून, हा नियम लागू करण्यात आल्याबद्दल समस्त महिलावर्गानेही समाधान दर्शिविल्याचे समजते.

Leave a Comment