ही आहे टायटॅनिकची ‘जुळी बहिण’

titanic
इंग्लंडमधून अमेरिकेला जाण्यासाठी निघालेली टायटॅनिक जेव्हा पहिल्यांदाच निघाली, तेव्हा तिला पाहण्यासाठी हजारो बघ्यांनी गर्दी केली होती. ‘द अनसिंकेबल शिप’, म्हणजेच कधीही बुडू शकणार नाही असा लौकिक मिळविलेली टायटॅनिक पाहण्याचे लोकांना फार अप्रूप वाटले होते. पण पुढे जे घडले आणि त्यामुळे या जहाजाबरोबरच सुमारे दीड हजार प्रवाश्यांना मिळालेली जलसमाधी ही घटना जागतिक इतिहासातील सर्वात दुखःद घटनांपैकी एक आहे. टायटॅनिकचा इतिहास जरी सर्वश्रुत असला, तरी या जहाजाला एक ‘जुळी बहिण’ही होती, आणि टायटॅनिकला जलसमाधी मिळत असताना ही जुळी बहिण टायटॅनिकच्या अगदी जवळपासच होती याची माहिती लोकांना फारशी नाही. इतकेच नव्हे, तर टायटॅनिकच्या मदतीसाठी यायला निघालेल्या या जहाजाला परत फिरण्यास सांगण्यात आले होते ही बाब देखील धक्कादायक आहे.
titanic1
जेव्हा टायटॅनिक बनविली जात होती, तेव्हा तिच्या जोडीनेच आणखी दोन प्रवासी जहाजांचे निर्माण केले जात होते. यातील एक जहाज ‘ऑलिम्पिक’ हे टायटॅनिकशी इतके मिळते जुळते होते, की दोन्ही जहाजांमधील फरक ओळखणे अवघड होते. त्यामुळे टायटॅनिक बुडाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या छायाचित्रांपैकी अनेक छायाचित्रे वास्तविक ऑलिम्पिकची असल्याचे म्हटले जाते. ही दोन्ही जहाजे इतकी एकसारखी असल्यामुळे जलसमाधी मिळालेले जहाज वास्तविक टायटॅनिक नसून ऑलिम्पिक होते, आणि विमा कंपनीकडून पैसे मिळावेत यासाठी हे जहाज मुद्दाम अपघात घडवून आणून बुडविले गेले असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. दोन्ही जहाजांवर प्रवाश्यांसाठी उत्तम सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या असल्या, तरी एका बाबतीत मात्र या जहाजांमध्ये कमतरता होती, ती म्हणजे या जहाजांवर पुरविण्यात आलेल्या लाईफ बोट्स. जर टायटॅनिक वर पुरेश्या लाईफ बोट्स असत्या तर अनेकांचे प्राण वाचू शकले असते.
titanic2
टायटॅनिक आणि ऑलिम्पिक या दोन्ही जहाजांनी प्रवासाच्या दरम्यान फ्रांसहून एकाच दिवशी पुढील प्रवासासाठी प्रयाण केले. जेव्हा टायटॅनिकला अपघात झाला, तेव्हा ऑलिम्पिक तिच्यापुढे सुमारे पाचशे मैलांच्या अंतरावर होती. टायटॅनिक हिमनगाला टकरविल्यानंतर त्यावरून मदतीसाठी आलेल्या संदेश ऑलिम्पिकवरील कर्मचाऱ्यांनाही मिळाला, आणि त्यानुसार ऑलिम्पिक मागे फिरली देखील, पण अपघातग्रस्त टायटॅनिकपासून सुमारे शंभर मैलांवर पोहोचल्यानंतर टायटॅनिकच्या मदतीसाठी तिथे अगोदर पोहोचलेल्या ‘कार्पेथिया’ जहाजाकडून ऑलिम्पिकला मदतीसाठी न येण्याची सूचना पाठविण्यात आली. एक तर ऑलिम्पिकवर टायटॅनिकवरील सर्व प्रवाश्यांना घेतले जाऊ शकेल एवढी जागा नव्हती, आणि दुसरे म्हणजे टायटॅनिकला झालेल्या अपघाताने मनावर भयंकर आघात झालेल्या प्रवाश्यांना टायटॅनिकची हुबेहूब प्रतिकृती पाहून मोठा मानसिक धक्का बसण्याची शक्यता लक्षात घेऊन ऑलिम्पिकला मागे फिरण्यास सांगण्यात आले.
titanic3
तिला मिळालेल्या सूचनेनुसार ऑलिम्पिक माघारी फिरली आणि तिने आपला प्रवास पुढे सुरु ठेवला. मात्र टायटॅनिकला घडलेल्या अपघाताची घटना ध्यानी घेऊन ऑलिम्पिकवर अतिरिक्त लाईफ बोट्सची सुविधा त्वरेने करण्यात आली. त्यानंतर ऑलिम्पिकने अनेक समुद्री सफारी सुरक्षितरित्या केल्या व `१९३५ साली तिला निवृत्त करण्यात आले. या जहाजाचे अनेक भाग इतर जहाजांच्या निर्मितीसाठी दिले गेले असून, या जहाजातील डायनिंग रूम नॉर्थंबरलंड येथील ‘व्हाईट स्वान’ हॉटेलमध्ये हलविण्यात आली आहे. आजही या आलिशान भोजनगृहामध्ये भोजन करण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आवर्जून येत असतात.

Leave a Comment