वायफायला सहज गंमतीत दिलेले नाव तरुणाला चांगलेच महागात पडले

wifi
काही दिवसांपूर्वी पुलवामा येथे घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देशामध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. देशभरामध्ये दिवंगत जवानांसाठी होत असलेले मूक मोर्चे, कँडल लाईट व्हीजिल्स, व सोशल मिडीयाच्या द्वारेही घडलेल्या घटनेच्या बाबतीत जनता शोक आणि संतापही व्यक्त करीत आहे. असे असताना मुंबईमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला काय सुचले आणि त्याने सहज गंमतीत आपल्या घरातील वायफायला चक्क ‘लश्कर ए तैय्यबा’ असे नाव दिले. त्यानंतर काय झाले असेल याची कल्पना तुम्ही सहज करू शकाल.
wifi1
या पूर्ण प्रकारची हकीकत अशी, की मुंबईतील खडकपाडा भागामध्ये राहणाऱ्या एका तरुणाने गंमतीत आपल्या वायफायला ‘लश्कर ए तैय्यबा’ हे नाव दिले. त्यानंतर त्याच बिल्डींगमध्ये राहणाऱ्या इतर लोकांच्या संगणकांवर आणि स्मार्ट फोन्सवर या नावाचे वायफाय नेटवर्क दिसू लागले. सध्या देशामध्ये अतिरेकी कारवाया वाढत असल्याची जाणीव सर्वांनाच आहे. याच भावनेने बिल्डींगमधील लोकांनी ‘लश्कर ए तैय्यबा’ नामक वायफाय सोसायटीच्या परिसरामध्ये असल्याची सूचना त्वरित सोसायटी प्रशासनाला दिली.
wifi2
‘लश्कर ए तैय्यबा’ एक आतंकवादी संघटना असल्याची माहिती सर्वश्रुत असल्याने सोसायटी प्रशासनाने देखील हे वायफाय नेटवर्क खरेच दिसत असल्याचे पाहून लगोलग पोलिसांना सूचित केले. ही सूचना मिळताच तातडीने सोसायटीमध्ये पोहोचलेल्या पोलिसांनी या तरुणाला अटक केली. अटक झाल्यानंतर पोलिसांशी बोलताना, आपल्याला आपल्या सोसायटीमधील लोकांशी थट्टामस्करी करण्याची लहर आल्यामुळे आपल्या वायफायला ‘लश्कर’चे नाव दिल्याचा खुलासा सबंधित तरुणाने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी चौकशीअंती या तरुणाची सुटका केली असली, तरी घडल्या प्रकाराने सर्वांनाच चांगला मनस्ताप झाला.

Leave a Comment