जेवणाची ऑर्डर चेन्नईमध्ये, डिलिव्हरी बॉय मात्र राजस्थानमध्ये !

food
आजकाल हव्या त्या रेस्टॉरंटमधून जेवण मागविण्याची सुविधा ‘स्वीगी’, ‘उबर इट्स’ आणि तत्सम सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या माध्यमातून सर्वत्र उपलब्ध झाली आहे. त्यामुळे वाहत्या गर्दीमधून आपल्या रेस्टॉरंटपर्यंत पोहोचण्याचे कष्ट, तिथवर पोहोचून रेस्टॉरंटमध्ये बसायला जागा मिळण्याची वाट पाहण्याचे कष्ट कमी होऊन आपले मनपसंत जेवण घरबसल्या उपलब्ध होण्याची सोय स्वीगी आणि तत्सम कंपन्यांनी करून दिली आहे. त्यामुळे अगदी भल्या सकाळी एक कप चहा पासून अगदी रात्री उशीरापर्यंत जेवण ऑर्डर करण्याची आयती सोय झालेली आहे.
food1
स्वीगी किंवा तत्सम अॅप वरून आपल्याला हवे ते रेस्टॉरंट निवडून तेथील मेन्यूमध्ये उपलब्ध असणारे, आपल्याला हवे ते पदार्थ ऑर्डर करता येत असून, त्याचे पैसे आगाऊ देऊन किंवा ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चा पर्याय निवडून आपली ऑर्डर नोंदविता येते. आपले भोजन आपल्यापर्यंत पोहोचविणारा स्वीगी किंवा तत्सम कंपनीचा कर्मचारी कुठवर पोहोचला हे देखील आपल्याला या अॅपच्या माध्यमातून ‘ट्रॅक’ करता येत असते. त्यामुळे अशा सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या द्वारे भोजन घरपोच मागविण्याची पद्धत फारच झपाट्याने लोकप्रिय झाली आहे. पण यातूनही अनेकदा काही मजेशीर घटना पहावयास मिळत असतात.
food2
चेन्नई मधील एका व्यक्तीने स्वीगी द्वारे आपल्या आवडत्या रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर केले, आणि काही वेळाने सहजच आपले जेवण घेऊन येणारा डिलिव्हरी बॉय कुठवर पोहोचला हे ट्रॅक करण्यासाठी त्याने पुन्हा एकदा अॅप उघडले. अॅपच्या द्वारे त्याचे जेवण घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयचे ‘लोकेशन’ चक्क राजस्थान येथे दाखविले जात असून, त्याचे जेवण त्याच्यापर्यंत पोहोचण्यास बारा मिनिटांचा अवधी लागणार असल्याचेही अॅप दर्शवित होते. हे पाहून क्षणभर स्तिमित झालेल्या या व्यक्तीने आपल्या ट्वीटर हँडलवर ट्वीट करून सर्व हकीकत सोशल मिडीयावर कथन करून, ‘स्वीगी, राजस्थानमध्ये असलेल्या डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन बारा मिनिटांमध्ये चेन्नईमध्ये पोहोचण्यासाठी तुम्ही नक्की कोणत्या वाहनाचा वापर करता’ अशा अर्थाचा ट्वीट केला आहे. घडल्या प्रकाराने नेटीझन्सची भरपूर करमणूक झाली असली, तरी स्वीगीने मात्र संबंधित ग्राहकाची माफी मागत असे प्रकार इथून पुढे घडू नयेत याची खबरदारी घेण्यात येईल असा निर्वाळा दिला आहे.

Leave a Comment