राजकारणापासून क्रिकेटला दूर ठेवणे योग्य – सरफराज अहमद

sarfaraz-ahmad
14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यात 40 पेक्षा अधिक जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात पाकिस्तान विरोधात संतापाची एकच लाट उसळली. या भ्याड हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्विकारल्यानंतर भारताने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्यास सुरुवात केली. त्याच पार्श्वभूमिवर भारताने आगामी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरोधात खेळू नये अशा मागणी जोर धरु लागली असतानाच राजकारणासाठी क्रिकेटचा वापर करणे चुकीचे असल्याचे पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमदने म्हटले आहे.

विश्वचषकामधील भारत आणि पाकिस्तान यांचा सामना वेळापत्रकानुसार खेळवला जावा. हा सामना जगभरातून कोट्यवधी प्रेक्षक पाहत असतात. पण क्रिकेटला राजकीय फायद्यासाठी लक्ष्य करणे योग्य नाही. पुलवामा हल्ल्यानंतर क्रिकेटला पुन्हा एकदा लक्ष्य केले जात आहे, जे चुकीचे आहे. राजकारण आणि खेळ यांची पाकिस्तानने कधीच सरमिसळ केलेली नसल्याचे सरफराजने म्हटले आहे.

भारत आणि पाकिस्तान 16 जून रोजी विश्वचषक स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. पण हा सामना पुलवामा हल्ल्यानंतर होईल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. पाकविरुद्ध क्रिकेट खेळू नये असे मत भारतामधून सौरव गांगुली, हरभजन सिंह यासारख्या माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे. तर सचिन तेंडुलकर, सुनिल गावसकर यांच्यासाठी खेळाडूंनीही, पाकिस्तानची न खेळता त्यांचा फायदा करुन देण्यापेक्षा मैदानात उतरुन सामना जिंकत पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली द्या असे मत व्यक्त केल्यामुळे विश्वचषकातील भारत-पाक सामन्याचे काय होते हे येणारा काळाच ठरवेल.

Leave a Comment